प्रतिनिधी | बीड
शहरातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. शरद शिंदे यांना रुग्णालय बांधकामाच्या कारणावरुन कुरापत काढून मारहाण केल्याच्या प्रकरणात चार जणांना न्यायालयाने चार महिन्यांची कैद व प्रत्येकी २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्या. आर. एस. बाेंद्रे यांनी हा निकाल दिला. सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. धनंजय वाकणकर यांनी काम पाहिले त्यांना अॅड. शहाजी जगताप यांनीही सहाय्य केले.दरम्यान, या प्रकरणात डॉक्टरांवर दाखल करण्यात आलेला विनयभंगाचा खोटा गुन्हाही न्यायालयाने खारीज केला.
डॉ. शरद शिंदे हे बीड शहरातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. आदर्श नगर भागात त्यांचे द्वारका हॉस्पिटल आहे. त्यांच्या रुग्णालयाचे बांधकाम सुरु असताना कुरापत काढून २ नोव्हेंबर २०१२ रोजी सकाळी ९ वाजता संतोष बन्सी जाधव, अभिमन्यू दादाराव तिबोले, आशा बन्सी जाधव आणि विद्या तिबोले (चौघे रा. शिक्षक कॉलनी) यांनी डॉ. शिंदे यांना शिविगाळ करुन टिकावाच्या लाकडी दांड्याने त्यांना मारहाण केली होती. यात ते जखमी झाले होते. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक सुनिल गोसावी यांनी तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. न्या. आर. एस. बोंद्रे यांच्या समोर प्रकरणाची सुनावणी झाली. सरकारी पक्षाच्या वतीने एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले. यात डॉ. शरद शिंदे, उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी यांच्यासह इतरांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. धनंजय वाकणकर यांनी प्रभावीपणे बाजू मांडली त्यांना ज्येष्ठ विधिज्ञ शहाजी जगताप, विशाल मुरळीकर यांनी सहकार्य केले. सरकारी पक्षाचा युक्तीवाद, समोर आलेले साक्ष, पुरावे ग्राह्य धरुन न्यायालयाने संतोष बन्सी जाधव, अभिमन्यू दादाराव तिबोले, आशा बन्सी जाधव आणि विद्या तिबोले या चौघांना या प्रकरणात दोषी ठरवले. त्यांना चार महिन्यांची कैद व प्रत्येकी २ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावल्याची माहिती सरकारी वकील अॅड. वाकणकर यांनी दिली.
विनयभंगाचा गुन्हा रद्द
दरम्यान, डॉक्टरांना मारहाण करुन उलट डॉक्टरांवरच खोटा विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. न्यायालयात आरोपी पक्षाकडून तीन खोटे साक्षीदाराही उभे केले गेले मात्र न्यायालयाने हा डॉक्टरांवरील विनयभंगाचा खोटा गुन्हा खारीज करण्याचे आदेश देत दिलासा दिला.. अॅड शहाजी जगताप यांनी या प्रकरणात बाजू मांडली.