बीड

महाराष्ट्रासाठी १६६१ मेट्रिक टन ऑक्सिजन उचलण्यास केंद्राची मंजुरी


दिल्ली, दि.२३ (लोकाशा न्यूज)
: देशभरातील करोना बाधितांच्या संख्येने उच्चांक गाठला असून अनेक राज्यात ऑक्सिजन अभावी रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. महाराष्ट्रातही ऑक्सिजनच्या मुद्द्याने रौद्र रुप धारण केले असून केंद्र सरकारने राज्याची ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन १६६१ मेट्रिक टन ऑक्सिजन साठा ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांकडून उचलण्यास मान्यता दिली आहे. तथापि हा ऑक्सिजन अद्यापि राज्याला मिळालेला नसून सध्या महाराष्ट्र सरकार स्वखर्चाने दररोज ४०० मेट्रिक टन ऑक्सिजन विकत घेत आहे. महाराष्ट्रात १२०० मेट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन होत असून उत्पादन होणारा सर्व ऑक्सिजन वैद्यकीय कारणांसाठी वापरण्याचा आदेश सरकारने जारी केला आहे. तथापि रोजच्या रोज राज्यात नव्याने ६५ ते ६८ हजार करेनाबाधित रुग्ण आढळून येत असून त्यांच्यासाठी १५५० मेट्रिक टन ऑक्सिजनचा वापर करावा लागत असल्याचे आरोग्य विभागातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
महाराष्ट्राला लागणारा जादाचा ऑक्सिजन राज्य सरकार ‘स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया’कडून विकत घेत असून जवळपास ४०० मेट्रिक टन ऑक्सिजन यासाठी विकत घेण्यात येत असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. ‘स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया’च्या नागपूर, हैदराबाद व गुजरात येथील प्लांटमधून हा ऑक्सिजन घेण्यात येत असून वाहतुकीसह सर्व खर्च राज्य सरकार करत आहे. राज्यात सध्या ६२ हजाराहून जास्त ऑक्सिजन बेड असून वाढत्या रुग्ण संख्येचा विचार करता आता केंद्राकडून जास्तीच्या ऑक्सिजनच्या पुरवठ्याला मान्यता मिळणे गरजेचे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशातील विविध राज्यातील ऑक्सिजन पुरवठ्याचा आढावा घेतला. त्यावेळी ऑक्सिजनची सर्वाधिक गरज असलेल्या बारा राज्यांची एकत्रित मागणी ४८०० मेट्रिक टन एवढी होती. त्यानंतर नव्याने आढावा घेतला असता ही मागणी सहा दिवसात वाढून ५,७६० मेट्रिक टन प्रतिदिन एवढी झाली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!