बीड

माजी मंत्र्यांना ५ तर खासदार ताईंना ६ वर्षात बायपासचे काम एक इंचही करता आले नाही, आता आयत्या आलेल्या निधीवर श्रेय घेणे केविलवाणे – लक्ष्मण पौळ

कठीण काळात जनतेला वाऱ्यावर सोडणारे दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घ्यायला मात्र बरोबर हजर होतात - राष्ट्रवादीचे पौळ यांची टोलेबाजी

परळी, दि. ०५ (लोकाशा न्यूज) : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघात दिलेल्या अभिवाचनांच्या पूर्ततेसाठी सातत्याने प्रयत्न केले असून, त्यांच्या प्रयत्नातून अनेक वर्ष केवळ भूमिपूजन समारंभ पाहिलेला परळी शहर बायपास आता प्रत्यक्षात उतरत आहे. या रस्त्याच्या चौपदरीरण कामासाठी केंद्राने ६०.२३ कोटी रुपये निधी मंजूर केला असून, कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली व कार्यारंभ आदेश देखील निघाले आहेत. या परिस्थितीत केंद्राने निधी मंजूर केला असल्याची कुणकुण लागताच ६ वर्षात बायपासचे काम एक इंचभर देखील पुढे नेऊ न शकलेल्या खासदार ताई या कामाचे श्रेय घेण्यासाठी खटाटोप करतात हे केविलवाणे असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ यांनी केली आहे.माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी मागील ५ वर्षांच्या सत्ताकाळात बायपास साठी टोकवाडी जवळ कोनशीला रोवून, बायपासचे भूमिपूजन, उद्घाटन असे सोपस्कार वेगवेगळे मंत्री आणून वेगवेगळ्या निवडणुकीच्या तोंडावर अनेकदा केले, पण त्यांना त्यांच्या ५ वर्षांच्या काळात व खासदार ताईंना त्यांच्या ६ वर्षांच्या काळात बायपासचे काम एक इंचभर देखील पुढे नेता आले नाही. परळी मतदारसंघातील परळी ते अंबाजोगाई रस्ता, परळी ते धर्मापुरी रस्ता, परळी ते गंगाखेड रस्ता या व अशा कोणत्याही रस्त्यासाठी एक रुपयाचे काम देखील करता आले नाही; आणि आता ‘केंद्रात आमची सत्ता आहे म्हणून निधी आमचाच’ हा युक्तिवाद केविलवाणा व सर्वसामान्य जनतेला देखील हास्यास्पद वाटत आहे.

कठीण काळात जनतेला वाऱ्यावर सोडले

कोरोनाच्या पहिल्या हल्ल्यापासून ना. धनंजय मुंडे साहेब प्रत्यक्ष फिल्डवर राहून जनतेची सेवा केली. राज्यात व बाहेर अडकलेल्या ऊसतोड कामगारांना सुखरूप आपापल्या घरी पोचवले, या कठीण काळात मुंडे भगिनी कुठे होत्या? परंतु जनतेला वाऱ्यावर सोडून मुंबईत राहून देखील मुंडे भगिनींनी पालकमंत्री महोदयांनी केलेल्या कामाचे श्रेय ‘ऑनलाईन’ पद्धतीने घेण्याचा घाट घातला.त्यामुळे गेल्या पाच सहा वर्षात परळीकर जनतेसाठी काहीही न करू शकलेल्या व त्यामुळेच परळीकरांनी नाकारलेल्या ताईंनी कोणतेही काम पालकमंत्र्यांनी करवून घेतले की त्यावर आपले नाव कोरायचा प्रयत्न करणे थांबवावे, असा सल्लाही लक्ष्मण पौळ यांनी दिला आहे.

महिन्यात रेल्वे आणणार असे वचन दिलेत, आता राज्याच्या निधिकडे बोट दाखवता?

दोन्ही ताईंनी २०१९च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही एका महिन्यात बीडच्या रेल्वेचे काम पूर्ण करू असे जाहीरपणे सांगून लोकांना मते मागितली. आता दीड वर्ष उलटले तरी काम जिथल्या जिथेच आहे आणि मुंडे भगिनी राज्य सरकारच्या वाट्याकडे बोट दाखवत आहेत. यामुळेच त्यांनी जनतेचा विश्वास गमावला आहे.

राज्य सरकार आर्थिक अडचणीत असताना देखील पालकमंत्री ना. मुंडे साहेब यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामार्फत टप्प्याटप्य्याने बीड रेल्वेसाठीचा निधीही उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. मागील आठवड्यातच राज्य वाट्याचे ६० कोटी रुपये बीड रेल्वे साठी प्राप्त झाले आहेत. परंतु जिल्ह्यात नसलेल्यांना याबद्दल माहिती असणे अपेक्षित नाही. तरीही राज्याने पूर्ण वाटा एकदम द्यावा असे वाटत असेल तर कठीण काळात राज्य सरकार ऐवजी केंद्राला मदत करण्याचे आवाहन करणाऱ्या दोन्ही ताईंनी भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाकडे विनंती करून केंद्राकडे थकित असलेले राज्याच्या वाट्याचे पैसे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत व त्याचे श्रेयही त्यांनी घ्यावे अशी मिश्किल टिप्पणी देखील लक्ष्मण पौळ यांनी केली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!