बीड

रामगड महंत वै.लक्ष्मण महाराज यांचे उत्तराधिकारी म्हणून ह.भ.प.अमोल महाराज धांडे यांची निवड


बीड प्रतिनिधी
रामगड हे पुरातन व थोरले संस्थान आहे. लक्ष्मण महाराजांच्या प्रयत्नातून येथे प्रगती झालेली आहे. पंचक्रोशीतील भाविक भक्त व नूतन महंत हे अमोल महाराज धांडे यांच्या पुढाकारातून नारायणगडाप्रमाणे रामगडाचाही विकास होईल असा विश्वास महंत शिवाजी महाराज यांनी रामगड येथे व्यक्त केला.
बीड जिल्ह्यातील विख्यात श्री रामचंद्र प्रभू रामगड देवस्थान येथील महंत ह.भ.प.लक्ष्मण महाराज यांचे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या बिजेच्या दिवशी अल्पशा आजाराने देहावसान झाले. रामगड येथे श्रीक्षेत्र नारायणगडाचे मठाधिपती ह.भ.प.शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व हजारो भाविक भक्त गणांच्या साक्षीने अंतिम विधी करण्यात आला होता.
आज श्री क्षेत्र नारायणगडाचे महंत ह.भ.प. शिवाजी महाराज व बंकटस्वामी संस्थानचे मठाधिपती लक्ष्मण महाराज मेंगडे,संभाजी महाराज, रामगडाचे विश्वस्त राजेंद्र मस्के,नारायणगडाचे विश्वस्त दिलीप गोरे, भीमराव मस्के,कुंडलिक खांडे,हेमंत क्षीरसागर,शिवराज बांगर,बबन गवते, सखाराम मोहिते,मसुराम कदम, जिजा चव्हाण,कोंडीबा निकम, उबाळे,संदीप उबाळे, यांच्यासह पंचक्रोशीतील उपस्थित भाविक भक्तांच्या एकमुखी निर्णयाने ह.भ.प.अमोल महाराज धांडे यांची रामगड देवस्थानचे मठाधिपती म्हणून निवड घोषित करून विधिवत रामगडाच्या गादीवर पुंडलिक वरदे हरी विठ्ठलाच्या जयघोषात बसवण्यात आले.
ह.भ.प. अमोल महाराज हे मूळ शिरूर कासार तालुक्यातील शिरापूर गात येथील रहिवासी असून महंत शिवाजी महाराज यांचे ते शिष्य आहेत. अध्यात्मिक व धार्मिक शास्त्रात ते पारंगत असून सुश्राव्य व अभ्यासू कीर्तनात निपुण आहेत.
५ दिवस उलटूनही उत्तराधिकारी नेमता आला नाही. आज सहाव्या दिवशी रामगडाचे सहावे महंत म्हणून धांडे महाराजांची घोषणा करून त्यांच्या हस्ते धार्मिक विधी करण्यात आले.
श्री क्षेत्र नारायणगडाचे महंत ह.भ.प. शिवाजी महाराज व बंकटस्वामी संस्थानचे मठाधिपती लक्ष्मण महाराज मेंगडे यांनी पुढाकार घेऊन पंचक्रोशीतील कुमशी, कांबी, घोसपुरी, वासनवाडी, जीरेवाडी,आनंदवाडी,खापरपांगरी,द.शहाजनपूर,सौन्दाना,कामखेडा,पेंडगाव, नामलगाव, माळापुरी,लोळदगाव,शिदोड,किन्हीपाई आदी गावांतील भक्त व ग्रामस्थांशी चर्चा करून एकमुखाने निर्णय घेण्याचा अधिकार महंत शिवाजी महाराज यांना देण्यात आला. कुमशी व सौंदाना येथील ग्रामस्थांचे वेगळे मत होते. अखेर सांगोपांग चर्चा होऊन महंत शिवाजी महाराज यांनी ह.भ.प.अमोल महाराज धांडे यांचे नाव घोषित केले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!