बीड प्रतिनिधी
महाराष्ट्रातील कोरोना विषाणू उद्रेक मार्च 2020 मध्ये सुरु झाला. कोरोना महामारी साथीच्या आजाराची पहिली नोंद महाराष्ट्रात झाली. 2020 मध्ये महाराष्ट्र राज्य हे देशातील सर्वाधिक प्रभाव झालेले राज्य ठरले. तर आज मार्च 2021 मध्येही देशातील कोरोना प्रभावी राज्यात अग्रेसर आहे. या एक वर्षाच्या कालखंडात राज्यसरकार कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यात अपयशी ठरले आहे. अपयश झाकण्यासाठी रुग्णांची संख्या वाढली कि लॉकडाऊनचे शस्त्र हाती घेतले जाते. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात लॉकडाऊन योग्य ठरला म्हणून आजच्या परिस्थितीत लॉकडाऊन अंतिम पर्याय ठरू शकत नाही. आजपासून घोषित केलेला लॉकडाऊनमुळे जनसामान्यांचे हाल व छोट्या-मोठ्या व्यपार्यांचे पुन्हा एकदा हाल करणारा निर्णय ठरणार आहे. अशी प्रतिक्रया भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी व्यक्त केली आहे.
राज्यसरकार कडक निर्बंध व उपाययोजना राबवण्यासाठी निर्णय घेऊ शकले नाही. सार्वजनिक आरोग्य यंत्रणा सुसज्ज व मजबूत ठेऊन कोरोना महामारीशी लढा देणे गरजेचे असताना नियोजन शून्य उपाययोजनांमुळे वाईट वेळ अनेक जिल्ह्यांवर आली आहे. डिसेंबर महिन्यात रुग्णांचा आकडा खाली आला कि सरकारने आरोग्य यंत्रणेकडे दुर्लक्ष केले. कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध घातले गेले नाहीत. गर्दी टाळण्यासाठी कठोर कारवाई केली गेली नाही. सरकारने कोरोनाचे गांभीर्य झटकल्याने जनतेमध्ये बेजबाबदारपणा वाढला. गेल्या एक वर्षांपासून सामान्य जनता, छोटे-मोठे व्यापारी, हातावर पोट असणारे मजूर हे आर्थिक सामना करत आहेत. अनेकजण अद्याप या आर्थिक संकटातून सावरलेले नाहीत. पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा म्हणजे जनसामान्य जनतेला आर्थिक संकटाच्या खाईत ढकलण्याचे काम आहे. लॉकडाऊनला अंतिम उपाय न समजता सरकारने कडक निर्बंध,प्रभावी उपाययोजना व कायम स्वरूपी सक्षम आरोग्य यंत्रणा निर्माण करून जनतेला विश्वासात घेऊन कोरोना विरोधात लढा देण्यासाठी सरकारने गांभीर्याने पाऊले उचलावीत व लॉकडाऊनच्या संकटातून सर्वांनाच मुक्त करावे असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले आहे.