बीड, दि. 25 (लोकाशा न्यूज) : बीड जिल्ह्यात मध्यरात्रीपासून येत्या चार एप्रिलपर्यंत संचारबंदी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या भावना लक्षात घेवून गुरूवारी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी पोलीस अधिकार्यांची बैठक घेऊन लॉकडाऊनच्या कालावधीत विनाकारण लोकांना मारू नका, रस्त्यावर असणार्या व्यक्तीकडे बाहेर असण्याचं कारण आधी समजून घ्या, विद्यार्थी परीक्षेला जात आहे का ? एखादा व्यक्ती औषध आणण्यासाठी जातय का? एखाद्याला दवाखान्यात जायचे आहे का? हे कारण समजून घेतल्यानंतर त्याला जावू द्या, एखादा बनावट असेल तर त्याला समज देऊन वापस पाठवा, अतिताईपणा करू नका, अशी समज देत दहा दिवसांचे लॉकडाऊन जनतेला विश्वासात घेऊन यशस्वी करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांनी या वेळी दिल्या.
गुरूवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्ह्यातील पोलीस अधिकार्यांची महत्वपुर्ण बैठक घेतली. या बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, अंबाजोगाईच्या अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागांचे डीवायएसपी उपस्थित होते. पोलीसांना सूचना देताना जिल्हाधिकारी जगताप म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळामध्ये विद्यापीठाच्या परीक्षा सुरू आहेत. परीक्षार्थी विद्यार्थी परीक्षेला येत असताना त्याच्याकडील हॉल तिकिट, आधार कार्ड बघून त्याला परीक्षेला सोडा, प्रसंगी शंका आली तर त्याचा फोटोही काढून घ्या, काहीच कारण नसताना एखादा व्यक्ती बाहेर पडला असेल तर त्याला मारहाण न करता पोलीसी भाषेत समज द्या, प्रसंगी त्याच्यावर पोलीस कलमानुसार काही किरकोळ कारवाई करता येईल का बघा, परंतु मारू नका, पोलीस विभागाकडे काही विभागाचे पास काढण्याची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे असे जे लोक पास काढण्यासाठी पोलीसांकडे येतील त्यांच्याशी सौजन्याने वागा आणि त्यांना लवकर पास कसा देता येईल याची कार्यवाही गतीने करा. विनाकारण पोलीस आणि शासनाबद्दल जनतेच्या मनात रोष निर्माण होईल, अशी कोणतीही कारवाई करू नका अशाही सूचना या वेळी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी पोलिसांना दिल्या. याबाबत पोलीसांच्या काही अडचणी असतील तर त्याही त्यांनी या वेळी सोडवण्याचा प्रयत्न केला.