मुंबई,दि. 10 (लोकाशा न्यूज) : सध्या देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर दुसरीकडे देशात करोनाचा सर्वाधिक फटकाही महाराष्ट्राला बसला आहे. असं असलं तरी राज्याचं अर्थचक्र सुरू करण्यासाठी आता लॉकडाउननंतर अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्यानं राज्यातील जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. अशातच नोव्हेंबर महिन्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होण्याची शक्यता आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी असे संकेत दिले. “राज्यात आता लॉकडाउनचा विषय राहिला नसून येत्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत महाराष्ट्र पूण अनलॉक होईल. करोनावर अद्याप आलेली नाही. त्यामुळे आपल्याला आता करोनासोबतच जगावं लागणार आहे,” असं टोपे म्हणाले. त्यांनी अहमदनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी यावर भाष्य केलं.
“येत्या नोव्हेंबरपर्यंत राज्यात सर्वकाही अनलॉक केलं जाईल. पुढील काही दिवसांत राज्यात टप्प्याटप्प्यानं शाळा, धार्मिक स्थळं, व्यायामशाळा उघडण्यात येणार आहेत. तसंच नोव्हेंबर महिन्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल अशी अपेक्षा करू,” असं टोपे म्हणाले. “करोना विषाणूवर अद्यापही लस आलेली नाही. त्यामुळे आपल्याला करोनासोबत जगावं लागणार आहे. आपल्याला काही नियम आणि शिस्त ही पाळलीच पाहिजे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.