पुणे : ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून विकसित करण्यात आलेल्या व सिरम इन्स्टिट्यूटकडून उत्पादित करण्यात येत असलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ या कोरोना प्रतिबंधक लसीच्या भारतातील चाचण्या थांबविण्याचा निर्णय सिरम इन्स्टिट्यूटने गुरुवारी घेतला आहे.
परदेशात एका स्वयंसेवकावर लसीचे दुष्परिणाम आढळल्याने तेथे मानवी चाचणी थांबवण्यात आली आहे. त्यानंतर भारतीय औषध महानियंत्रकांनी बजावलेल्या नोटिसीनंतर दुसर्याच दिवशी (दि. 10) ‘सिरम’नेदेखील हा निर्णय घेतल्यामुळे लसीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अॅस्ट्राजेनेका, ऑक्सफर्ड विद्यापीठ या औषध निर्मात्या कंपन्यांकडून ‘कोव्हिशिल्ड’ लस विकसित करण्यात येत असून, त्याचे उत्पादन पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटकडून सुरू आहे. परदेशात जरी चाचणी थांबवण्यात आली असली, तरी भारतात या लसीची चाचणी सुरू राहील, अशी माहिती ‘सिरम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अदर पूनावाला यांनी ट्विटरद्वारे बुधवारी दिली होती. मात्र, याबाबत आक्षेप घेत पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भारतीय औषध महानियंत्रकांनी (डीसीजीआय) परदेशातील चाचण्या थांबवण्यात आल्यावर त्याची माहिती ‘डीसीजीआय’ला का दिली नाही, अशी विचारणा नोटिसीद्वारे केली आहे. तसेच भारतातील चाचण्या का थांबवण्यात येऊ नयेत, अशी विचारणा नोटिसीत केली आहे.
सिरम इन्स्टिट्यूटने याबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. आम्ही भारतातील लस चाचणीचा आढावा घेत असून, अॅस्ट्राजेनेका कंपनी चाचण्या सुरू करेपर्यंत भारतातील चाचण्या थांबवत आहोत, असे त्यात स्पष्ट केले आहे. आम्ही ‘डीसीजीआय’च्या सूचनांचे पालन करीत असून, त्याबाबत सध्या काही टिपणी करू शकत नाही, असेही ‘सिरम’ने स्पष्ट केले आहे.
लस घेतल्यानंतर हाडांना सूज
चाचणी प्रक्रियेत सहभागी झालेल्या इंग्लंडच्या एका महिलेच्या हाडांना सूज आल्याची माहितीही पुढे आली आहे. अॅस्ट्राजेनेकाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही सामान्य प्रक्रिया आहे. आता रुग्णाच्या आजाराच्या कारणांचा शोध घेतला जाईल, यामुळे चाचणीची विश्वासार्हता कायम राहील. मोठ्या प्रमाणावर चाचणी होत असल्यास स्वयंसेवक आजारी पडण्याची शक्यता असते; पण याचा स्वतंत्ररीत्या तपास होणे गरजेचे आहे. आम्ही याचा शोध घेत आहोत. चाचणीच्या मुदतीवर याचा परिणाम होऊ नये, असाच आमचा प्रयत्न राहील.