बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यासाठी त्यांचे लोकेशन देणारा मस्साजोग येथीलच सिद्धार्थ सोनवणे याच्या देखील स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी काल कल्याण (मुंबई) येथून एका उसाच्या गाडीवर काम करत असताना मुसक्या आवळल्या आहेत. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा आता पूर्णपणे उलगडा होण्यास मदत होणार आहे.
केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या केल्याच्या घटनेने जिल्ह्याला हादरवून सोडले होते. या हत्या प्रकरणातील फरार आरोपींपैकी प्रमुख सुदर्शन घुले व सुधीर सांगळे या दोघांनाही बीडच्या पोलिसांनी शुक्रवारी (दि.३) रात्री पुण्यातून ताब्यात घेतले आहे. तर या आरोपींना सरपंचाचे लोकेशन पुरविणारा मस्साजोग गावातीलच सिद्धार्थ सोनवणे याला देखील मुंबईतून बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. यापूर्वीच जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले यांना अटक केली आहे. तर तर पुरवणी जबाब आवरून विष्णू चाटे यांना देखील अटक करण्यात आलेली होती. सध्या या प्रकरणात कृष्णा आंधळे हा फरार आहे.
अंत्यविधीला होता उपस्थित
दरम्यान संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सिद्धार्थ सोनवणे हा गावातच होता. मयत देशमुख यांच्या अंत्यविधीला देखील तो उपस्थित होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस सुरुवातीला आरोपींचा तपास करत असताना त्यांनी आपले लक्ष गावातच केंद्रित केलेले होते. अपहरण करण्यापूर्वी कोणीतरी जवळचा व्यक्ती लोकेशन देत असावा असा संशय पोलिसांना होता. लोकेशन देणाऱ्यांचा पोलीस शोध घेत असल्याची कुणकूण सिद्धार्थ सोनवणे याला लागली होती. घटनेच्या दोन दिवसानंतर तो देखील गावातून फरार झाला.
फरार झाल्यामुळे संशय वाढला
सिद्धार्थ सोनवणे फरार झाल्यानंतर त्याच्या संदर्भातील गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मिळवण्यास सुरुवात केली. त्यानंतर सिद्धार्थ हा देखील या गुन्ह्यात सहभागी असल्याची खात्री स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना पटली. त्यानंतर 15 दिवसांपासून त्याचा शोध सुरू होता.
अखेर लोकेशन ट्रेस
सिद्धार्थ सोनवणे हा फरार झाल्यानंतर मुंबईत लपून बसला होता. त्याने या काळात वेगवेगळी पाच सिम कार्ड देखील वापरली होती. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना त्याचे मुंबईतील लोकेशन मिळताच त्या ठिकाणी त्यांनी सापळा लावला. एका मोकळ्या पटांगणात उसाच्या गाड्यावर काम करत असतानाच पोलिसांनी त्याच्यावर झडप मारली.
या टिमची कामगिरी
ही कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय महेश विघ्ने, तुळशीराम जगताप, विकास वाघमारे, भागवत शेलार, गणेश मराडे, विक्की सुरवसे यांनी केली.