बीड

एसपींच्या कडक अ‍ॅक्शनमुळे खाकीच्या कामात वाहू लागले बदलाचे वारे, सुरक्षेसाठी जिथे गरज तिथे पोलिस तात्काळ पोहचणार, मला कामात थोडाही कुचराईपणा नकोय, लगेच कामाला लागा, सर्व अवैध धंदे आजची आज बंद करा,नवनीत काँवत यांचे ठाणेदारांना सक्त आदेश, जिल्ह्यातील सर्वच ठाण्यांना भेटी देवून कामकाजाची घेणार झाडाझडती



बीड, दि. 23 (लोकाशा न्यूज) : पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या कडक अ‍ॅक्शनमुळे जिल्हा खाकीच्या कामात खर्‍या अर्थाने बदलाचे वारे वाहताना दिसून येत आहे. कारण आता सुरक्षेच्या अनुषंगाने जिथे गरज तिथे पोलिस तात्काळ पोहचणार आहेत. याअनुषंगानेच आजची आज कामाला लागा, अशा स्पष्ट सुचना एसपींनी ठाणेदारांना दिल्या आहेत. मला कामात थोडाही कुचराईपणा नकोय, आपआपल्या भागातील सर्व अवैध धंदे आजची आज बंद करा, त्यांच्याविरूध्द तातडीने कारवाई करा, वाळू माफिया, गुटखा माफियांच्या मुसक्या आवळा, वाळूची एकही गाडी रस्त्यावर दिसणार नाही याची खबरदारी घ्या, अशाही सुचना त्यांनी यावेळी दिल्या आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे ते स्वत: जिल्ह्यातील सर्वच ठाण्यांना भेटी देवून ठाण्याअंतर्गत कामकाजाची झाडाझडती घेणार आहेत.
सोमवारी पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी जिल्ह्यातील सर्व अधिकार्‍यांसोबत गुन्हे आढावा बैठक घेतली, सकाळी साडे दहा वाजता सुरू झालेली ही बैठक दुपारी दिड वाजता संपली. या बैठकीत संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेवून एसपींनी ठाणेदारांनाही सक्त सुचना केल्या आहेत. एखादा गुन्हा घडल्यानंतर त्या प्रकरणात तात्काळ गुन्हा नोंद करून आरोपींना अटक करा, शाळा, महाविद्यालय परिसरात मुलींच्या सुरक्षेसाठी त्या भागात पेट्रोलिंग वाढवा. कसल्याही प्रकारचा भेदभाव होता कामा नये, कायद्यापुढे सर्वजण समान आहेत. त्यादृष्टीने कारवाई करा अशा सुचना पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांनी दिल्या. जिल्हाभरातील सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये आजपासून शिस्त दिसेल याची काळजी घ्या, अशी तंबीही त्यांनी दिली. क्युआर कोड सिस्टीम लवकरच कार्यान्वीत करणार असुन या सिस्टीममुळे सर्व सामान्य नागरीकांनाही थेट माझ्यापर्यंत तक्रार करता येईल असे त्यांनी म्हटले आहे. काल झालेल्या गुन्हे आढावा बैठकीस अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, चेनता तिडके, डीवायएसपी विश्‍वाभंर गोल्डे, निरज राजगुरू, बाळासाहेब हानपुडे, उमेश कस्तूरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उस्मान शेख, पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, देविदास गात, शिवाजी बंटेवाड, अशोक मोदीराज, मारूती खेडकर, मुकूंद कुलकर्णी, वाहतूक शाखेचे सुभाष सानप, धारूर ठाण्याचे ठाणेदार देविदास वाघमोडे यांच्यासह जिल्ह्यातील इतर अधिकार्‍यांची उपस्थिती होती.

पोलीस अधिक्षकांनी घेतली
देशमुख कुटूंबियांची भेट
बीडच्या पोलीस अधिक्षक पदाचा पदभार घेतल्यानंतर पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांनी रविवारी रात्री उशिरा केज तालुक्यातील मस्साजोग येथे भेट देवून देशमुख कुटूंबियांशी चर्चा केली. फरार आरोपींना लवकरच अटक करू असा विश्वास त्यांनी देशमुख कुटूंबियांना दिला.

शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात
पेट्रोलिंग वाढणार
शिक्षण घेणार्‍या मुलींची छेडछाड होवू नये याअनुषंगाने पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी काळजी घेतली आहे. त्यासाठी त्यांनी ठाणेदारांना शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात पोलिस पेट्रोलिंग वाढविण्याच्याही सुचना केल्या आहेत.

कारवयांसाठी पथकाची चाचपणी
जिल्ह्यात एकही अवैध धंदा चालू द्यायचा नाही याअनुषंगाने पोलिस अधीक्षकांनी अ‍ॅक्शन घेतली आहे. विशेष म्हणजे अवैध धंद्यांवर कारवया करण्यासाठी पथक स्थापन करायचे की नाही यासंदर्भात पोलिस अधीक्षकांकडून चाचपणी केली जाणार आहे.

शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी
प्रत्येक गुन्ह्याचा तपास प्रभावीपणे होणार
गुन्हेगारांविरोधात फक्त गुन्हाच दाखल होवून गरजेचे नाही, अशा गुन्ह्यात शिक्षाही होणे तेवढेच महत्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येक गुन्ह्याचा तपास प्रभावीपणे करून शिक्षेचे प्रमाण वाढविण्याच्याही सुचना यावेळी एसपींनी सर्वच अधिकार्‍यांना केल्या आहेत.

जिल्ह्याला रिझल्टच मिळणार
नुतन पोलिस अधीक्षक नवनीत काँवत हे एक कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, त्यांनी रूजू होताच कामाला प्रभावीपणे सुरूवात केली आहे. स्वत:प्रमाणेच त्यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांना कर्तव्य बजावण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे काँवत यांच्या कर्तव्यदक्षपणामुळे बीड जिल्ह्याला चांगला रिझल्टच मिळणार आहे.

मुख्यालयातील गायब हायवाचे प्रकरण
एसपींपर्यंत पोहचले
जिल्हाधिकार्‍यांनी पकडलेले दोन हायवा पोलिस मुख्यालयात लावण्यात आले होते, यापैकी एक हायवा सोडून देण्यात आला होता. आता हेच प्रकरण नव्या एसपींपर्यंत पोहचले आहे. त्यांनी याप्रकरणाची अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांच्याकडून माहितीही घेतली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!