बीड

चार दिवसात रस्त्यावरील हटणार अनधिकृत होर्डिंग, ध्वनी प्रदूषण करणार्‍यांवर थेट गुन्हे दाखल होणार, गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी कलेक्टर, एसपींनी यंत्रणा ताकतीने लावली कामाला


बीड, दि. 27 (लोकाशा न्यूज) : गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी अविनाश पाठक आणि पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी आपली यंत्रणा ताकतीने कामाला लावली आहे. त्याअनुषंगानेच येत्या चार दिवसात रस्त्यावरील अनाधिकृत होर्डिंग हटविले जाणार आहेत. तसेच गणेशोत्सवात ध्वनी प्रदुषण करणार्‍यांवर थेट गुन्हे दाखल केले जाणार आहेत. त्यामुळेच
शांततापूर्वक आणि संयमीपणाने सर्वांनी येणार्‍या काळातील गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश पाठक आणि पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी केले आहे.
जिल्ह्यातील गणेशोत्सवासह येणार्‍या काळातील सणांच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक मंगळवारी नियोजन समितीच्या सभागृहात झाली, यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यातील शांतता समितीच्या या बैठकीला पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलिस अधिक्षक सचिन पांडकर, पोलिस उपविभाग माजलगाव डी. बी. धिरजकुमार तसेच निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील नगरपालिकांचे मुख्य अधिकारी तसेच प्रशासकही यावेळी बैठकीत उपस्थित होते. शहरात उत्सव चांगल्या पद्धतीने पार पाडावा यासाठी बीडमधील नगर रोडवरील एक बाजू येत्या आठ दिवसात सुरू केली जाईल. व दुसर्‍या बाजुचे खड्डे बुजविले जातील आणि पुढील काम उत्सवानंतर केले जाईल असे त्यांनी सांगितले. मिरवणूक मार्गावर असणार्‍या विजेच्या तारांपासून सुरक्षा असावी या दृष्टीकोणातून कामे करावीत असे निर्देश त्यांनी वीज मंडळास यावेळी दिले. मंडळांनी शांततेत उत्सव पार पडावा यासाठी सहकार्य करावे, असे ते म्हणाले. तसेच बीड शहरातील तसेच इतर भागातील सर्व अनधिकृत होर्डिंग येत्या चार दिवसात हटविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री पाठक यांनी दिले. जिल्ह्यातील मोठ्या गावांमध्ये ग्रामपंचायतींनी होर्डिंग हटवावेत असेही ते म्हणाले.  तंत्रज्ञान प्रगत झाले आहे त्यामुळे डिजिटल पुरावे कोणीही गोळा करू शकते या पार्श्वभूमीवर ध्वनी प्रदूषण होणार नाही याची खबरदारी मंडळांनी घ्यावी तसे झाले नाही तर थेट गुन्हे दाखल होतील, असेही गणेश मंडळाच्या अध्यक्षांना त्यांनी सांगितले. सोबतच मंडळांनी स्वतंत्र वीज मीटर घ्यावे. त्यासाठी एका दिवसात मीटर देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, कुणासही काही अडचण असल्यास त्यांनी व्हाट्सपच्या 8788998499 या क्रमांकावर लेखी किंवा छायाचित्रांद्वारे कळवावे. यावेळी ग्रामीण भागात तालुका पातळीवर मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धा घेतली जाईल तसेच राज्य शासनाच्या गणेशोत्सव स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले.  पोलीस अधीक्षक यांनी कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन यावेळी केले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी केले. 

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!