बीड (प्रतिनिधी)
दि.९ : ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’ हे मुलींनी सर्वच क्षेत्रात गरुडझेप घेऊन सिध्द करून दाखवले आहे. अशात आता मुलींना आणखी बळ देण्याच्या उद्देशाने महायुती सरकारने मोफत उच्च शिक्षणाचा निर्णय घेतला असून शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये १०० टक्के सवलतीचा लाभ मिळणार आहे. यामुळे मुलींची आणखी प्रगती होणार आहे. या निर्णयाचे सर्वस्तरातून स्वागत केले जात आहे. कल्पतरूच्या सचिव डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांनी महायुती सरकारचे आभार मानले आहेत.
पत्रकात पुढे म्हटले आहे की, व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग तसेच इतर मागासवर्ग प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कात १०० टक्के प्रतिपूर्ती देण्याचा म्हणजेच शिक्षण पूर्णपणे मोफत देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला होता. यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील मुलींचं उच्चशिक्षणाचं स्वप्न पूर्ण होणार आहे. यापुढे जिजाऊ- सावित्रीच्या प्रत्येक लेकीला आकाशाला गवसणी घालण्यास महायुती सरकारचं बळ मिळणार आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, ना.अजितदादा पवार, कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील, महिला व बालविकास मंत्री ना.आदितीताई तटकरे यांचे आभार मानले आहेत.