बीड : कलयुगात कधी काय घडेल, कोण कुठून आणि कुणाच्या माध्यमातून कसा घात करेल हे निश्चित सांगता येत नाही, त्यामुळेच तर प्रत्येकाला हादरा देणार्या घटना सध्या मोठ्या प्रमाणात घडत आहेत, अशीच एक सर्वांना धक्का देणारी घटना उघडकीस आली आहे. बीडपासून जवळच असलेल्या पोई मंदिर परिसरातील आश्रमात वास्तव्यास असलेल्या एका अल्पवयीन मुलीला जवळच्याच नातेवाईकाने पळवून नेवून तिच्यावर बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे, आई-वडिलांनी जन्माच्या अवघ्या सहा महिण्यानंतर त्या पीडित मुलीला सदर आश्रमात सोडले होते, सध्या त्या पीडितेचे वय 14 असून घडलेला हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. या निंदनीय घटनेची माहिती मिळाल्यानंतर बीड ग्रामीण पोलिस ठाण्याचे ठाणेदार सुजित बडे यांनी याच आश्रमातील आणखी सात अल्पवयीन मुलींबरोबरच पाच मुलांचीही सुटका केली आहे. त्या सर्वांना बीडच्या बाल कल्याण समितीकडे सोपविण्यात आले आहे.
बलात्कार, खून अशा गंभीर घटना सातत्याने देशात घडत आहेत. बीड जिल्हाही त्याला अपवाद नाही, जिल्ह्यात यापुर्वीही बलात्काराच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. अशा घटनेत जवळच्याच नातेवाईकांकडून घात केला जात असल्याचे सातत्याने पहायला मिळत आहे. सर्वांना हादरा, सर्वांना धक्का देणारी अशीच एक बलात्काराची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात आरोपीविरूध्द 363, 376 भादविसह बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बीडपासून जवळच असलेल्या पोई मंदिर परिसरात तेरा आश्रम आहेत. या आश्रमात अनेकांनी आपली बालके सोडलेली आहेत. एका कुटूंबाने अवघ्या सहा महिण्याची मुलगी या आश्रमात ठेवली होती, सध्या तिचे वय 14 आहे, या मुलीला तिचा एक चाळीस वर्षीय नातेवाईक सातत्याने भेटायला येत होता, या भेटीचा त्याने गैरफायदा घेवून आपल्या मुलीसारख्या असलेल्या 14 वर्षीय बालिकेला पळवून नेवून तिच्यावर बलात्कार केला आहे. बलात्काराची घटना सोलापुर हद्दीत घडल्याचे बीड ग्रामीण पोलिसांकडून सांगितले जात आहे. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीने या बालिकेवर बलात्कार केला आहे, ती व्यक्ती दोन मुलांचा बाप आहे, बाप असतानाही सदर व्यक्तीला हे घाणेरडे कृत्य करण्यास थोडीही लाज वाटलेली नाही, हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर मागच्या दोन दिवसांपुर्वी बीड ग्रामीण ठाण्याचे ठाणेदार सुजित बडे यांनी पोई मंदिराच्या परिसरातील त्या आश्रमात असलेल्या सात अल्पवयीन मुलीसह पाच मुलांची सुटका केली आहे, पीडित मुलीसह इतर 12 बालके बीड ग्रामीण पोलिसांनी बाल कल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आली आहेत. त्यानुसार पुढील कार्यवाही बाल कल्याण समितीचे अध्यक्ष अभय वनवे, सदस्य तत्वशिल कांबळे, सामाजिक कार्यकर्ते अशोक तांगडे हे करीत आहेत.
आश्रमात मुले सोडणे धोक्याचेच
बालकांना आश्रमात सोडणे हे अत्यंत धोक्याचेच आहे, हे सातत्याने समोर आलेले आहे. कुणी दुखत असल्याच्या तर कुणी धर्माचे शिक्षण घेण्यासाठी पालकांनी पोई मंदिर परिसरात असलेल्या आश्रमात आपली बालके सोडली होती, हे अनाधिकृत तर आहेच. मात्र या ठिकाणी ते सुरक्षीत राहू शकत नाहीत, असाही अंदाज असल्यामुळे बीड ग्रामीण पोलिस आणि बीडच्या बाल कल्याण समितीने मागच्या दोन दिवसांपुर्वी या आश्रमातील 12 बालकांची सुटका केली आहे. ते सध्या बाल कल्याण समितीच्या ताब्यात आहेत. जवाबानंतर बाल कल्याण समिती त्यांना त्यांच्या आई-वडीलांच्या ताब्यात देणार आहे.