बीड

राशन धान्य दुकानदारांकडून कोरोनाला आमंत्रण

मशीनवर अंगठा लावला तरच मिळेल धान्य

बीड दि. 14 :- लॉकडाऊनमुळे अनेकांच्या संसाराच्या चालत्या गाड्याला खीळ बसली आहे. त्यामुळे उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला. अशा परिस्थितीतही शहरासह गावोगावी रेशनवर अधिक धान्य मिळू लागल्याने गोरगरीबांच्या पोटापाण्याचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही, तेव्हा हे धान्य ऑफलाईन दिले जात होते. आता मात्र, दररोज शेकडोने कोरोना रुग्ण आढळून येत असताना मशीनवर अंगठा स्कॅन केला तरच धान्य मिळेल, असे रेशन दुकानदारांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे एकीकडे पोटाचा प्रश्‍न तर दुसरीकडे रेशन दुकानवर सर्वांचा संपर्क येत असल्याने जीव मुठीत धरून धान्य घेण्याची वेळ लाभार्थ्यांवर आली आहे. तीच धान्य देण्या-या दुकानदारांवर आल्याचे चित्र आहे.

मराठवाड्यात एकट्या बीड जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यात साडेपाच लाख शिधापत्रीकाधारक आहेत. या कार्डधारकांना दर महिन्याला गहू, तांदुळ तर लॉकडाऊनमुळे डाळही दिली जात आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अचानक लॉकडाऊन करण्यात आल्याने हातावर पोट असणार्‍या नागरिकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला. शहरात तर ठेले, हातगाडे, रस्त्यावर फिरून वस्तू विकणारे, हमालीसह लहानसहान काम करणारे यांच्या कुटुंबाची चक्क उपासमार होत होती. यामुळे हजारो लोक पुणे-मुंबई येथून गावी आले, यात बीड जिल्ह्यातही मोठ्या संख्येने आलेल्या नागरिकांचा समावेश आहे.
याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धान्य योजना जाहीर केली. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज घडीला रोजगार नसला तरी प्रत्त्येक कुटुंबाला माणसी पाच किलो धान्य मिळू लागले आहे. यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. कोरोनाचा संसर्ग पसरू नये, यासाठी हे धान्य गेल्या तीन महिन्यात ऑफलाईन पद्धतीने दिले जात होते. एकतर ग्रामीण भागात शहरातून आलेल्या नागरिकांकडे संशयाने पाहिले जात आहे, अशा परिस्थितीत आता शहरातील नागरिक रेशन दुकानवर गेल्यास त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
बीड जिल्ह्यात रेशन वितरणासाठी जिल्हाधिकारी यांनी योग्य पद्धत लावून दिली होती. त्यामुळे रेशन वितरीत सुरळीत झाले. मात्र, आता ई-पॉस मशीनवर या महिन्यापासून रेशन दुकानदार अंगठा करा, असा आग्रह धरीत आहे. बीड जिल्ह्यात एकही रुग्ण नसताना ऑफलाईन धान्य दिले, मात्र आता दररोज शंभर ते दोनशे रुग्ण आढळून येत आहेत. बीड शहरात तर अँटीजेन तपासणीमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आले. रेशन दुकानशी प्रत्त्येक कुटुंबातील एका व्यक्तीचा संपर्क येतो, अशा परिस्थितीत अंगठा द्यायचा म्हटल्यास सोशल डिस्टन्स राहणार नाही, त्यातच ग्रामीण भागात दुकानवर गर्दी होते, मास्क वापरण्याचे प्रमाण कमी असून अंतर राखा, मास्क लावा असे सांगितल्यास छोटे-मोठे वादही होत आहेत. अशा परिस्थितीत कसा अंगठा लावावा? असा प्रश्‍न लाभार्थ्यांकडून व्यक्त होत आहे. शिवाय अंगठा लावल्यास सोशल अंतर राखले जाणार नाही. त्यामुळे धान्य घ्यावे की नाही, असाही प्रश्‍न व्यक्त होत आहे. कारण सर्वांनीच अंगठा लावल्यास कोरोना संसर्गाची भीती व्यक्त होत आहे. कार्डधारक अशा दुहेरी कात्रीत सापडल्याने काय करावे? अशी पंचाईत झाल्याचेही लाभार्थ्यांमधून सांगितले जात आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!