बीड, दि.8 (लोकाशा न्यूज) : राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षकाने दारू ढोसून बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात गोंधळ घातल्याची घटना शुक्रवारी दि.5 जानेवारी रोजी घडली होती. याबाबत उलट सुलट चर्चा होत होती, या प्रकरणावर दै. लोकाशाने वृत प्रकाशित केले होते, या वृत्ताची दखल घेत पिवून झेडपीत गोंधळ घालणार्या आमटे या शिक्षकाला सीईओ अविनाश पाठक यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. या कारवाईमुळे शिक्षण विभागातील अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
यासंदर्भात माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विजय आमटे नामक शिक्षक बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात अनेक दिवसांपासून असलेल्या पदोन्नतीच्या कामासाठी शुक्रवारी पिऊन आले होते. पदोन्नती संदर्भात संचिका तात्काळ का प्रस्तावित करत नाहीत? या व अन्य कारणावरून त्यांनी शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचार्यांची हुज्जत घातल्याची घटना घडली. सदर कामासाठी आमटे शिक्षणाधिकार्यांशी शुक्रवारी सकाळी भेटले होते, ते पुन्हा दुपारनंतर शिक्षण विभागात आले. काही अधिकारी व कर्मचारी यांच्याशी आरडाओरड करून ’माझे काम लवकर का होत नाही. मी इमारतीवरून उडी मारिन’,असे म्हणत हुज्जत घातली. यासंदर्भात दै. लोकाशाने आठ जानेवारीच्या अंकात पहिल्या पानावर वृत्त प्रकाशित केले होते, याच वृत्ताची तात्काळ दखल घेवून सीईओ अविनाश पाठक यांनी विजय आमटे या शिक्षकास सेवेतून निलंबित केले आहे. पाठक यांनी केलेल्या या कारवाईमुळे शिक्षण विभागातील अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
शिक्षकच दारू पिवू लागले तर
विद्यार्थ्यांचे कसे भल्ले व्हायचे?
विजय आमटे हे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक आहेत. त्यांना दारूचे व्यसन असल्याचेही आता स्पष्ट झाले आहे. कारण त्यांनी दारू पिवून झेडपीत गोंधळ घातला आहे. याच कारणास्तव त्यांना निलंबित करण्यात आले आहे. जर शिक्षकच दारू पिवू लागले तर विद्यार्थ्यांचे कसे भल्ले व्हायचे? असा प्रश्न आता सर्वांना पडू लागला आहे.