( बीड प्रतिनिधी )
बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या पुढाकारातून बीड विधानसभा मतदार संघातील NH 211 ते मंझरी – करचुंडी ग्राम -71 या रस्ता व पूल बांधकामा साठी दहा कोटी रुपयाचा निधी पुरवणी अर्थसंकल्पात मंजूर झाला आहे.यामुळे हा रस्ता व पुलाचे बांधकाम होईल. व ग्रामस्थांना वाहतुकीसाठी चांगला रस्ता मिळेल अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली.
मंझरी ते करचुंडी हा ग्रामीण रस्ता असून हा रस्ता अत्यंत खराब आहे. खराब रस्ता आणि पुलाअभावी ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो. बरेच दिवसापासून हा रस्ता सुधारण्याच्या प्रतीक्षेत होता. ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी खा. प्रितमताई मुंडे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडे मागणी करून निधीचा आग्रह धरला होता. पुरवणी अर्थसंकल्पात या रस्त्याचा समावेश करून सिमेंट रस्ता व मोठा पूल बांधण्यासाठी दहा कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. लवकरच टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन कामाचा शुभारंभ होईल. या रस्ता कामाला मंजुरी मिळाल्यामुळे मंझरी -करचुंडी परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करून खा. प्रितमताई व जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांना धन्यवाद दिले आहे.