बीड, दि. 3 (लोकाशा न्यूज) : शहरात घडलेल्या दगडफेक, जाळपोळीच्या घटनेनंतर तीन दिवसांनी जिल्ह्याची इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली. नेट सुरु झाल्यामुळे बीड जिल्ह्यातील व्यापार्यांचे व इतर रखडलेले व्यवहार सुरळीत झाले. यासह जाळपोळ, दगडफेकीत 11 कोटींचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात झालेली जाळपोळीची घटना अत्यंत भयंकर असून भविष्यामध्ये अशा घटना घडू नये यासाठी पोलीस आता विशेष खबरदारी घेतील. जाळपोळीच्या घटनेच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षकांनी संबंधित अधिकार्यांना योग्य त्या सूचना केल्या आहेत. या प्रकरणात आतापर्यंत 65 गुन्हे नोंद झाले असून 134 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे. यासह ज्यांच्याकडे जाळपोळ, दगडफेक घटनेचे व्हिडिओ, फोटो, फुटेज असतील त्यांनी हे फोटो पोलीस प्रशासनाला द्यावेत असे आवाहन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केले आहे. हे फोटो व्हिडिओ पाठवण्यासाठी पोलीस प्रशासनाने एक व्हाट्सअप नंबर (9765151298) जारी केला आहे. फोटो, व्हिडिओ पाठवणार्यांची नावे गुपित ठेवणार असल्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकरे यांनी सांगितले. यासह ज्यांचे दगडफेकेत नुकसान झालं आहे अशांनी सुद्धा संबंधित ठाण्यामध्ये तक्रारी द्याव्यात असे आवाहन सुद्धा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केले आहे.
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंतरवाली सराटी येथील आंदोलन गुरूवारी (ता. 02) राज्य सरकारचे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांना भेटल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी 2 जानेवारीपर्यंत मागे घेतले. यामुळे जिल्हा प्रशासनाने टेन्शन दूर झाले आहे. तब्बल तीन दिवसानंतर शुक्रवारी बीड जिल्ह्यातील इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली. इंटरनेट सेवा सुरू झाल्यामुळे बीड जिल्ह्यातील व्यापारी वर्गामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. इंटरनेट सेवा बंद असल्यामुळे येथील व्यापार्यांना व इतर क्षेत्रांमध्ये विविध अडचणींचा सामना संबंधितांना करावा लागत होता. यासह दिपावली निमित्त ये-जा करणार्या प्रवाशांची गैरसोय दुर होणार आहे. कालपासून बस सेवा सुरळीत सुरू झाल्यामुळे लालपरी परत रस्त्यावर दिसू लागली आहे. जिल्ह्यामध्ये जाळपोळ झाल्यानंतर सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु प्रशासनाने बळाचा वापर केल्यानंतर हाताबाहेर गेलेली परिस्थिती काही वेळातच आटोक्यात आल्यामुळे पुढील अनर्थ टळले. यासह सध्या जाळपोळ घटनेतील जे दोषी आहेत त्या दोषींवर कारवाई करण्याची मोहीम पोलीस प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. यातील दोषींवर योग्य ती कारवाई व्हावी, यासाठी आता पोलिसांनी कंबर कसली आहे. ज्या युवकांनी या आंदोलनामध्ये या जमावांमध्ये सहभागी होत तोडफोड केली, जाळपोळ केली त्यांचे आयुष्य मात्र बरबाद होणार आहे.
कुमावतांमुळे तपासाला येणार गती
बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीमध्ये ज्या जाळपोळ, दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत यामध्ये राष्ट्रवादी भवन, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे ऑफिस, आ. संदीप क्षीरसागर यांचे घर, कुंडलिक खांडे यांचे ऑफिस, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांचे ऑफिस, बीआरएसचे दिलीप गोरे यांचे ऑफिस, धैर्यशील सोळंके यांचे घर, अॅड सुभाष राऊत यांचे हॉटेल यासह इतर ठिकाणी जाळपोळ करत दगडफेक करण्यात आली होती. याच प्रकरणाचा तपास आता पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांच्याकडे दिला आहे. शहरातील जाळपोळ व दगडफेकचा तपास पंकज कुमावत यांच्याकडे दिल्यामुळे या तपासाला आता गती मिळणार असून जे दोषी आहेत, त्यांच्यावर मात्र योग्य ती कारवाई होईल. यासह पोलीस उपअधिक्षक संतोष वाळके, शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे प्रमुख केतन राठोड हे अधिकारी पंकज कुमावत यांना मदत करणार आहेत.
पोलीस अधीक्षकांनी जाळपोळ, दगडफेक
झालेल्या ठिकाणांना दिली भेट
बीड शहरामध्ये गेल्या चार दिवसांपूर्वी ज्या ज्या ठिकाणी दगडफेक, जाळपोळीच्या घटना घडल्या, त्या ठिकाणी गुरुवारी दुपारी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी भेट देत आढावा घेतला. यामध्ये आ. संदीप क्षीरसागर यांचा बंगला, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचे ऑफिस, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांचे ऑफिस, बीआरएसचे दिलीप गोरे यांचे ऑफिस, धैर्यशील सोळुंके यांचा बंगला, जालना रोड, सुभाष रोड, राष्ट्रवादी भवन यासह इतर ठिकाणी भेटी देत पोलीस अधीक्षकांनी संबंधित अधिकार्यांकडून या घटनेचा सविस्तर आढावा घेत संबंधित अधिकार्यांना योग्य त्या सूचना केल्या.
फुटेज, व्हिडिओ, फोटो पाठवण्याचे
पोलीस प्रशासनाचे आवाहन
बीड शहरामध्ये झालेल्या जाळपोळ, दगडफेक मध्ये कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. याच अनुषंगाने आता पोलीस प्रशासनाने एक व्हाट्सअप नंबर जारी केला असून या व्हाट्सअप ( 9765151298) नंबर वर ज्यांच्याकडे जाळपोळ दगडफेक चे व्हिडिओ फुटेज, फोटो असतील त्यांनी या नंबर वर ते व्हिडिओ फोटो, फुटेज पाठवावेत असे आव्हान स्वतः पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केले आहे. विशेष म्हणजे ज्यांनी ज्यांनी फोटो, फुटेज, व्हिडिओ पाठवले आहेत. त्यांची नावे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गुपित ठेवण्याचे ठेवण्यात येणार आहेत. यामुळे नागरिकांनी न भिता उपलब्ध असलेले फोटो, फुटेज, व्हिडिओ पाठवावेत असे आव्हान सुद्धा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केले आहे.