बीड, दि. 13 (लोकाशा न्यूज) : शिरूरमधील मुलांच्या शासकिय वसतिगृहाच्या इमारत बांधकामाच अंदाजपत्रकास अखेर प्रशासकिय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता शिरूरमध्ये नऊ कोटी एक्क्यान्नव लाख रूपये खर्च करून वसतिगृहाची टोलेजंग इमारत उभी राहणार आहे. 13 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने यासंदर्भात
जीआर काढला आहे. दरम्यान या वसतिगृहामुळे ऊसतोड कामगार, गोरगरिबांच्या लेकरांच्या शिक्षणाला गती मिळणार आहे.
आयुक्त समाजकल्याण आयुक्तालय पुणे यांनी संत भगवानबाबा मुलांचे शासकिय वसतिगृह ता. शिरूर जि.बीड येथील वसतिगृह इमारत बांधकामाचा नऊ कोटी एक्यान्नव लक्ष एक हजार नऊशे चौर्याऐंशी या रकमेचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. वित्त विभागाच्या दि. 20 सप्टेंबर 2019 रोजीच्या शासन निर्णयास अनुसरून सदर वसतिगृहाचे अंदाजपत्रकास मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, छत्रपती संभाजीनगर यांनी साक्षांकित केले आहे. त्यास अनुसरून सदर अंदाजपत्रकास प्रशासकिय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती. त्यानुसार सदर अंदाजपत्रास खालील अटी व शर्तीस अनुसरून प्रशासकिय मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष म्हणजे जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.