धारूर:-डॉक्टर घरी नाहीत याचा अंदाज घेऊन अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून दागिन्यांसह ९० हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली आहे .या प्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात डॉक्टरांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धारूर – तेलगाव रोडवर बाजार समिती यार्डामध्ये डॉ.सत्यप्रेम नागनाथ हवेलीकर यांची तीन मजली इमारत आहे . यामध्ये तळमजला येथे दवाखाना असून दुसऱ्या मजल्यावर त्यांचे निवासस्थान आहे. ५ डिसेंबर रोजी ते पत्नी , सून यांच्या सह मुलाकडे मुंबईला गेले होते .दरम्यान १५ डिसेंबर रोजी धारूर येथील अभिमन्यू काळे नामक मित्र हे घरी गेले असता दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी त्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता मी मुंबईला आहे असे सांगितल्यानंतर काळे नामक मित्रांस त्यांनी पहाणी करण्याचे सांगितले . त्यांनी आतमध्ये प्रवेश केला असता आत मध्ये कुलूप तोडलेले दरवाजे कपाट उघडे आढळून आले. ही घटना डॉ. हवेलीकर यांना सांगितल्यानंतर ते रात्री प्रवास करून गुरुवारी सकाळी धारूर येथे आले . घराची पाहणी केली असता आपल्या येथे चोरी झाल्याचे उघड झाले .यामध्ये तळमजला व दुसऱ्या मजल्यावरील खोल्यांचे तीन कुलूप तोडून आत मध्ये अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून चांदीचे भांडे यामध्ये ग्लास, प्लेट, कृष्णाची मूर्ती, ताट, वाटी, मनी मंगळसूत्र,दोन अंगठ्या असा एकूण ९० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी सत्यप्रेम हवेलीकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धारूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.