मुंबई: गणेशोत्सवानंतर अद्याप तरी रुग्णसंख्या फारशी वाढलेली नाही. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. राज्यात ४ ऑक्टोबरपासून कोरोना नियमांचं पालन करुन शाळा करण्यात येणार आहे. इयत्ता ५ वीपासूनचे पुढील वर्ग सुरु करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियम पाळून शाळा सुरू केल्या जाणार आहेत. तसेच संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे सर्व निर्णय राहतील, असंही शासनाने स्पष्ट केलं आहे. मात्र, गेल्या दीड वर्षापासून बंद असणाऱ्या शाळा सुरु होत असल्यानं विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी ही आनंदाची बाब आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत सातत्याने घसरण होत असून रुग्ण बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. यामुळेच आता शाळा सुरू करण्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य शासनाला या आधीच चाइल्ड टास्क फोर्सकडून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्या त्या जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करता स्थानिक प्रशासन आणि अधिकारी तेथील शाळा सुरू करण्यासंदर्भात योग्य निर्णय घेऊ शकतील, शाळा सुरू करता येतील, असं चाइल्ड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. बकुळ पारेख यांनी मत व्यक्त केलं होतं. चाइल्ड टास्क फोर्सकडून ज्या मार्गदर्शक सूचना शिक्षण विभागाला दिल्या गेल्या आहेत, त्याबाबतची तयारी करून राज्यभर एकत्रित शाळा सुरू करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने शाळा सुरू करणे योग्य ठरेल, असंही बकुळ पारेख यांनी म्हटलं आहे.