पाच सप्टेंबर रोजी झेडपी ‘जिल्हा शिक्षक
पुरस्कारा’ने 22 शिक्षकांचा करणार सन्मान
24 ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे
शिक्षणाधिकार्यांनी सर्व बीईओंना दिले आदेश
बीड, दि. 18 (लोकाशा न्यूज) : येत्या पाच सप्टेंबर रोजी बीड जिल्हा परिषद जिल्हा शिक्षक पुरस्काराने 22 शिक्षकांचा सन्मान करणार आहे. याअनुषंगानेच शिक्षणाधिकार्यांनी जिल्ह्यातील सर्वच बीईओंना पत्र पाठविले आहे. 24 ऑगस्टपर्यंत शिक्षकांचे प्रस्ताव सादर करा, असे आदेश कुलकर्णी यांनी या पत्राव्दारे दिले आहेत.
दरवर्षी 05 सप्टेंबर रोजी माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती दिनी उत्कृष्ट कार्य करणार्या शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान करुन गौरव करण्यात येतो. या वर्षांचा जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यासाठी आपल्या तालुक्यातील पात्र शिक्षकांची माहिती गटविकास अधिकारी व सभापती पंचायत समिती यांच्या संमतीने दि. 24 ऑगस्ट रोजी 2021 पर्यंत विना विलंब अटी व शर्तीच्या अधिन राहुन सादर करावी, सदर कार्यक्रम हा कालमर्यादित असल्यामुळे प्रस्तावास विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी. यासाठी एका विस्तार अधिकार्यांची नियुक्ती करण्यात यावी, विलंबास आपणास जबाबदार धरण्यात येईल याची नोंद घ्यावी, दि. 31 मे 2021 रोजी मुख्याध्यापकांची या जिल्हयातील सेवा संलग सेवा 20 वर्ष व शिक्षकांची 15 वर्ष असावी,जे शिक्षक प्रति नियुक्तीवर आहेत व नियमित वर्ग अध्यापन करत नाहीत अशा शिक्षकांची शिफारस करण्यात येऊ नये, शिक्षकांचे शैक्षणिक कार्य , राष्ट्रीय कार्य , सामाजिक कार्य , ऑनलाईन शिक्षण, बाला उपक्रम, माझी शाळा सुंदर शाळा, कोव्हिड -19 या राष्ट्रीय आपत्तीमध्ये केलेले कार्य , धनवन उपक्रम , आंतरिक्ष शाळा , अॅस्ट्रॉनामी क्लब इत्यादी उपक्रमामध्ये घेतलेला सहभाग व विद्यार्थ्यांसाठी राबविलेले उपक्रम इत्यादी बाबी विचारात घेऊन शिक्षकांची शिफारस करावी, गुन्हा दाखल झालेले, विभागीय चौकशी प्रलंबित अथवा प्रस्तावित असलेल्या शिक्षकांची शिफारस करण्यात येऊ नये, शिक्षकांनी गटशिक्षणाधिकारी यांना प्रस्ताव सादर करण्याचा दि. 20 ऑगस्ट 2021 असुन गटशिक्षणाधिकारी यांनी दि. 23 ऑगस्ट 2021 पर्यंत प्राप्त प्रस्तावाची छाननी करुन दि. 24 ऑगस्ट 2021 रोजी या कार्यालयास प्रत्येक तालुक्यातुन 02 प्राथमिक शिक्षक, 02 माध्यमिक शिक्षक व 01 विशेष शिक्षक ( कला क्रीडा व कार्यानुभव तसेच अपंग याची माहिती पाठवावी, एकुण 5 शिक्षकांपैकी किमान 1 महिला शिक्षिका असावी, प्रस्ताव पाठविण्यापूर्वी त्यातील माहिती, प्रमाणपत्रे इत्यादी पडताळून पहावी व पुराव्यासह प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील सर्व बीईओंना पत्राव्दारे केले आहे.