बीड

नियम तोडणार्‍यांना माफी नाहीच, थोडेही गाफिल राहू नका, प्रत्येक नियमांचे काटेकोरपणे पालन करा, जिल्हाधिकार्‍यांचे तहसिलदारांना आदेश


बीड, दि. 3 (लोकाशा न्यूज) : आष्टी, पाटोदा, शिरूर, गेवराई तालुक्यातील कोरोना परिस्थितीसह लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचा उपविभागीय पोलीस अधिकारी, मुख्याधिकारी, नगरपंचायत व गटविकास अधिकारी यांच्याकडून रोज आढावा येथील तहसीलदारांनी घ्यावा व निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकार्‍यांनी तहसीलदारांना दिले असून ज्या तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात आहे तेथील तहसीलदारांनीही गाफील न राहता प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.
मराठवाड्यात सर्वाधिक रुग्ण हे बीड जिल्ह्यात आढळून येत असल्याने ज्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत त्या आष्टी, पाटोदा, शिरूर, गेवराई तालुक्यात जिल्हा प्रशासनाकडून निर्बंध लावण्यात आले असून अत्यावश्यक सेवांसह अन्य दुकाना उघडण्यासाठी सकाळी सात ते साडेबारा वाजेपर्यंत येथील नागरिकांना वेळ दिला आहे. अशा स्थितीत शासनाच्या निर्बंधांचे उल्लंघन करणार्‍यांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर तहसीलदारांनी रोजच्या रोज तालुक्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्याचेही जिल्हाधिकार्‍यांनी सुचवले आहे. शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करत दुकान उघडे ठेवणे, विना मास्क फिरणे, गर्दी करणे असे प्रकार या तालुक्यातील शहरी किंवा ग्रामीण भागात आढळून आल्यास त्या व्यावसायिकांसह नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचेही आदेशात म्हटले आहे. ज्या तालुक्यामध्ये रुग्णसंख्या कमी आहे त्या तालुक्यातील तहसीलदारांनी गाफील न राहता रोज आढावा घेण्याचे सांगून कोरोना परिस्थिती वाढणार नाही याकडे लक्ष देण्याचे सांगितले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!