मुंबई । दिनांक २८।
लसीकरणाचा दुसरा डोस घेणाऱ्यांचे ‘वेगळे’ आणि पहिला डोस घेणाऱ्यांचे ‘वेगवान’ नियोजन करणे हे आव्हानात्मक काम आहे, असे सांगत लसीकरण करणाऱ्या सर्व यंत्रणांना भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी ट्विट करुन शुभेच्छा दिल्या आहेत. तथापि, रेमडेसीवर इंजेक्शन सारखा अन्याय लसीकरणाच्या बाबतीत बीड जिल्हयावर होऊ नये याची खबरदारी घ्यावी असेही त्यांनी म्हटले आहे.
१८ ते ४४ वयाच्या नागरिकांना मोफत लस ही घोषणा महत्त्वाकांक्षी तरीही स्वागतार्ह आहे. सूक्ष्म नियोजन लस मिळवण्यासाठी आणि सुरळीत लसीकरण करण्यासाठी हे मोठे आव्हान आहे. जनतेचे स्वास्थ्य सुरक्षित ठेवण्याच्या आव्हानांना पेलण्यासाठी यंत्रणांना शुभेच्छा देत त्या म्हणाल्या,
जेष्ठ नागरिक आणि लसीचा दुसरा डोस घेणार्या लोकांचे वेगळे नियोजन आणि १८ ते ४४ वयोगटांतील लोकांचे वेगवान नियोजन करावे लागेल. लसीकरण होताना विलंब अथवा दिरंगाई होता कामा नये. रेमडेसीवर सारखे वाटप अन्यायकारक होऊ नये हे अत्यंत महत्वाचे आहे.जास्तीत जास्त लसीकरण केंद्र कमीत कमी अवधी हे सूत्र करावे लागेल..लसींचा उत्पादन करणे, साठा बनवणे,तापमान नियंत्रित करणे यावर प्राधान्याने लक्ष केंद्रीत करावे लागेल असे त्या म्हणाल्या.
शासनाने शब्द पाळावा
येत्या १ मे रोजी दुसरा डोस उपलब्ध करणे शासनाला क्रमप्राप्त आहे तो शब्द शासनाने जनतेला दिला आहे तो पाळलाच पाहिजे. केवळ केंद्र शासनावर जबाबदारी टाकून जमणार नाही. राज्याचे लसीकरण, रेमडेसीवरचे ऑडिट आणि दररोज याची माहिती जनतेला मिळाली पाहिजे असे पंकजाताई मुंडे म्हणाल्या. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी लसींच्या किमती एवढी रक्कम कोविडच्या लढ्यात द्यावी, त्याचे एक स्पेशल पोर्टल बनवावे असेही त्यांनी सुचवले आहे.