बीड, दि. 24 (लोकाशा न्यूज) : खा. प्रीतमताई मुंडे यांना कोरोनाची लक्षणं दिसू लागली आहेत. त्यांनी नुकताच बीड जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दौरा केला होता. त्यानंतर मुंबईला परतल्यावर त्यांना त्रास जाणवायला लागला. यानंतर त्यांनी आपली आरटीपीसीआर कोरोना चाचणी केली. मात्र, त्याचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. असं असलं तरी त्या घरीच विलगीकरणात थांबल्या आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने आणखी काही टेस्ट करणार असल्याचीही त्यांनी माहिती दिली. एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी आपल्या समर्थकांशी संवाद साधला आहे.
प्रीतमताई मुंडे म्हणाल्या, की मागील आठवड्यात 14 ते 18 एप्रिल या काळात संपूर्ण जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन मी प्रत्येक कोविड सेंटरला भेट दिली. तेथे रुग्णांची आणि डॉक्टरांची विचारपूस केली. प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या. त्यांना योग्य ती कारवाई करायला भाग पाडलं. या माध्यमातून मी आपलं कर्तव्यच पार पाडतेय. हे काम करुन मी पुन्हा 18 एप्रिलला मुंबईला आले. त्यानंतर 2-3 दिवसांनी मला कोरडा खोकला, सर्दी, ताप आणि प्रचंड अशक्तपणा अशी लक्षणं जाणवायला लागली. मी 21 एप्रिल रोजी टेस्ट केली. त्यात कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आलाय. केवळ आरटीपीसीआरची चाचणी निगेटिव्ह आली म्हणून आपल्याला कोरोना नाही या भ्रमात राहू नका. जर आपल्याला लक्षणं असतील तर आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा. मीही माझ्या डॉक्टरांशी संपर्क साधला आणि त्यांनी दिलेली औषधं घरीच विलगीकरणात राहून घेत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणखी काही चाचण्या मला कराव्या लागतील. त्याची माहिती तुम्हाला नक्कीच सांगेल, असंही त्यांनी नमूद केलं.
मी माझ्या कर्तव्यात कमी पडणार नाही, पण
प्रीतमताई मुंडे म्हणाल्या, मी माझ्या कर्तव्यात कमी पडणार नाही. पण आज स्वतः आजारी असताना काहीतरी मागे पुढे होऊ शकतं, कमीजास्त होऊ शकतं. परंतू पंकजाताई मुंडे, जिल्ह्यातील इतर सर्व आमदार आणि भाजपची टीम खंबीरपणे संपूर्ण जिल्ह्यात सर्वांना मदत करण्यासाठी अहोरात्र कटीबद्ध आहे. सर्वांनी आपली अडलेली कामं त्यांच्या माध्यमातून पूर्ण करुन घेऊ शकता. तुम्हा सर्वांच्या आशिर्वादाने पुन्हा लवकरच आपल्या सेवेत रुजू होईल. सर्व नागरिकांना कळकळीची विनंती की कोणतंही लक्षण, दुखणं अंगावर न काढता त्वरित आपल्या जवळच्या आरोग्य यंत्रणेला संपर्क साधा. लवकरात लवकर उपचार मिळवा. जितक्या लवकर आजाराची माहिती होईल आणि उपचार होतील तितकं कोरोनावर मात करण्यात यश मिळेल. मी काळजी घेत आहे, तुम्हीही काळजी घ्याल हीच विनंती, असंही आवाहन त्यांनी केलं.
पंकजाताईही झाल्या क्वारंटाईन, चार दिवसानंतर
करणार कोरोना टेस्ट
पंकजाताईंनी सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली आहे. परळी, बीड, नगरमध्ये कोरोना रूग्णांच्या संपर्कात आल्याच्या शक्यतेमुळे मी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे माझ्या सोबत जे दोन दिवस होते त्यांनी कडक आयसोलेशन पाळावे, मी माझी कोरोना चाचणी चार दिवसानंतर करेल असे म्हटले आहे.