परळी । दिनांक २२।
अंगरक्षक गोविंद मुंडे यांचे कोरोनामुळे दुःखद निधन झाल्याचे समजताच भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे हळहळल्या. परिवाराला व्हिडीओ काॅल करून त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. गेल्या कांही दिवसांपासून त्याला या आजारातून बरे करण्यासाठी त्या खूप प्रयत्न करत होत्या परंतू काळाने त्याला अखेर हिरावून नेले.
कन्हेरवाडी येथील रहिवासी असलेले गोविंद मुंडे (वय ४०) हे पंकजाताई मुंडे यांचे २००९ पासून अंगरक्षक होते. मागील आठवडय़ात ते कोरोना पाॅझेटिव्ह आल्यानंतर त्यांचेवर परळीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते पण प्रकृती सुधारत नसल्याने त्यांना लातूर येथे हलविण्यात आले. गोविंदची तब्येत सुधारावी ते यातून सुखरूपपणे बाहेर यावेत यासाठी पंकजाताई मुंडे दररोज डाॅक्टर, रूग्णालयातील यंत्रणा आणि त्याच्या कुटूंबियांशी बोलत होत्या, त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. परंतू बुधवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मावळली, त्यांच्या पश्चात आई, वडिल, भाऊ, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.
गोविंद मुंडे यांच्या निधनाबद्दल पंकजाताई मुंडे यांनी दुःख व्यक्त केले आहे. ”माझ्या परिवारातील एका तरूण, मेहनती व धाडसी सदस्य आपण गमावला आहे, त्यांच्या कुटूंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर देवो” अशा शब्दांत त्यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.
••••