बीड

मोमीनपुरा येथील शादीखाना,मुलींच्या वसतीगृहासह बंधार्‍याच्या पुलाचा प्रश्न लागणार मार्गी, आ.संदिप क्षीरसागरांनी मंत्री नवाब मलीक,मंत्री जयंत पाटील यांची घेतली भेट


बीड (प्रतिनिधी):- बीड शहरातील मोमीनपुरा भागात शादीखाना इमारत प्रस्तावित असून त्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा तसेच शहरातील अल्पसंख्यांक मुलींच्या वसतीगृहासाठी अधिकचा निधी देण्याची मागणी आ.संदिप क्षीरसागर यांनी अल्पसंख्यांक मंत्री नवाबजी मलीक यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी सकारात्मक भूमिका घेवून दोन्ही प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच शहरातील बिंदुसरेच्या नदीवरील खासबाग ते मोमीनपुरा भागाला जोडणार्‍या बंधारा कम पुलाच्या कामात काही त्रुट्या आढळल्या होत्या. सदर त्रुट्याची पुर्तता करून सदर प्रश्न लवकर मार्गी लावण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची ही आ.संदिप क्षीरसागर यांनी भेट घेतल्यानंतर सदर काम तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे.

बीड शहरातील मोमीनपुरा भागात शादीखाना करण्यात यावा अशी मागणी शहरातील नागरिकांकडून करण्यात येत होती. या मागणीच्या अनुषंगाने आ.संदिप क्षीरसागर यांनी मंत्री नवाब मलीक यांच्याकडे मोमीनपुर्‍यातील शादीखान्यासह रखडलेल्या अल्पसंख्यांक मुलीच्या वसतीगृहाचा प्रश्न मांडला. दोन्ही प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले. त्याचबरोबर खासबाग ते मोमीनपुरा भागाला जोडणारा बंधारा कम पुलाचे काम सुरू झाले होते. परंतू कामाच्या प्रस्तावात काही त्रुटी निघाल्याने कामाची गती मंदावली. आ.संदिप क्षीरसागर यांनी प्रशासनाशी संवाद साधत त्रुटीची पुर्तता करून घेतली. या कामाची गती वाढावी यासाठी त्यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेवून कामाला गती देण्यात यावी तसेच काम तातडीने पुर्ण करण्यात यावे अशी मागणी केली. बिंदूसरा नदी पात्र परिसरात नागरिकांना होणार्‍या या पुलामुळे शहरातील प्रवास सुकर होणार आहे. जोपर्यंत हा प्रकल्प पुर्ण होत नाही तोपर्यंत मी पाठपुरावा करत राहणार आहे अशी प्रतिक्रिया आ.संदिप क्षीरसागर यांनी दिली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!