बीड, दि. 6 (लोकाशा न्यूज) : बीड जिल्हा प्रशासनाने जो काही निर्बंधाबाबतचा निर्णय सोमवारी रात्री जाहीर केला आहे, तो संपुर्ण निर्णय हा राज्य शासनाचा आहे. जिल्हावासियांना माझी हात जोडून विनंती आहे, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाच्या नियमांचे पालन करावे, शासन आणि प्रशासनाला लोकांचे जीव वाचवणे हे महत्वाचे आहे. आमचे ध्येय तेवढेच असल्याचे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी माध्यमांशी सांगितले.
बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. अशा गंभीर परिस्थितीमध्ये कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन सदृश्य निर्बंध गरजेचे आहेत. जिल्ह्यातील व्यापार्यांसह नागरिकांनी ही बाब गंभीरतेने समजून घ्यावी. रात्री जिल्ह्यातील बहुतांशी व्यापार्यांसोबत आपली चर्चा झाली असून त्यांनी प्रशासनाला मदत करण्याची तयारी दर्शविली आहे, असं सांगत जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी जिल्ह्यातील जनतेला हात जोडून विनंती केली आहे. शासन आणि प्रशासनाला लोकांचे जीव वाचवणे महत्वाचे आहे. जीव असतील तर सर्व काही. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्व वर्गातील जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे. आपण सर्व काही उपलब्ध करू शकतो, परंतु वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर हे उपलब्द करू शकत नाहीत. त्यात आज अनेक औषधांचा तुटवडा आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचा संसर्ग रोखणं नितांत गरजेचं असल्याने नागरिकांनी घरात राहून कोरोनाची लढाई लढावी, असे आवाहन या वेळी जगताप यांनी केली.