मुंबई, दि. 5 एप्रिल : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे अखेर अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले आहे. पण, सरकारला जे जरी उशिरा सुचले असेल पण आणखी अनेक राजीनामा घेतल्यावरच दुरुस्त म्हणता येईल, असं म्हणत भाजपच्या नेत्या आणि माजी महिला आणि बालविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी आघाडी सरकारला टोला लगावला.
अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यामुळे भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर एकच भडीमार सुरू केला आहे. पंकजाताईंनीही ट्वीट करून आघाडी ठाकरे सरकारला चांगलाच टोला लगावला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. ‘ देर आये पर दुरुस्त नहीं आये ’, या सरकारला आणखी अनेक राजीनामे घ्यावे लागतील म्हणजे ’दुरुस्त आये ’ म्हणणे शक्य तरी होईल, असा टोला त्यांनी लगावला आहे. दरम्यान, ’सचिन वाझे प्रकरण, मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही गृहमंत्रिदाचा राजीनामा दिला आहे. राज्यात एवढ्या भयानक घडामोडी घडत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत का नाहीत, त्यांचे मौन अस्वस्थ करणारं आहे’ अशी खोचक टीका भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ’परमबीर सिंग यांनी जे काही आरोप केले होते. त्याबद्दल मुंबई हायकोर्टाने निर्णय दिला आहे. त्यानंतर हे अपेक्षितच होतं की राजीनामा आवश्यक होता. हा राजीनामा उशीरा झाला आहे, तात्काळ राजीनामा घ्यायला हवा होता, पण आज देशमुख यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला आहे, पण ही नैतिकता पहिल्या दिवशीच आठवायला हवी होती, असा टोला फडणवीस यांनी लगावला. अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला असला तरी एका गोष्टीचं मला कोडं आहे, अनेक भयानक गोष्टी राज्यात झाल्या आहे. पण तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे का बोलत नाहीत. मुख्यमंत्र्यांचं मौन अस्वस्थ करणारं आहे. सचिन वाझे काय लादेन आहे काय, ही त्यांची शेवटची प्रतिक्रिया आहे. त्यामुळे त्यांनी आता बोललं पाहिजे, असा सणसणीत टोलाही फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला.