परभणी, दि. 25 (लोकाशा न्यूज) : अॅट्रासिटीच्या गुन्ह्यामध्ये मदत करून अर्ज मागे घेण्यासाठी व कँटीन चालवू देण्यासाठी एका नागरिकाकडून तब्बल 1 लाखाची लाच स्विकारून रकमेसह रेल्वे पोलिसाने पलायन केले. गंगाखेड येथे गुरुवारी दि.25 मार्च रोजी एसीबीने सापळा रचून परळी रेल्वे पोलिस ठाण्यातील सपोनिसह तिघांवर कारवाई केली.
याबाबत एका 45 वर्षीय तक्रारदाराने तिघांविरोधात लेखी तक्रार अर्ज दिला होता. माधुरी महादेवराव मुंढे (वय 32 वर्षे व्यवसाय- सहायक पोलिस निरीक्षक, शासकीय रेल्वे पोलीस स्टेशन, परळी वैजनाथ), संजय त्रंबक भेंडेकर (वय 53 वर्ष, व्यवसाय पोह ब.नं 214 नेमणूक शासकीय रेल्वे पोलीस स्टेशन, परळी वैजनाथ), प्रेमदास दयाराम पवार (वय 37 वर्षे, पोलीस शिपाई ब.नं 567 शासकीय रेल्वे पोलीस स्टेशन, परळी वैजनाथ) यांचा यात समावेश आहे. 18 मार्चला गंगाखेड येथे रेल्वे पोलिस ठाण्याच्या पार्किंग जजवळ व 20 मार्च रोजी परळी येथे रेल्वे पोलीस ठाण्यात त्या तिघांनी 1 लाख रूपये लाच मागितली होती. यातील रेल्वे पोलीस हवालदार संजय त्रंबक भेंडेकर याने तक्रारदाराकडून 1 लाख रुपये स्वीकारले व ही रक्कम घेऊन तो पळून गेला. तक्रारदारांच्या विरुद्ध अॅट्रासिटी अर्जामध्ये मदत करून अर्ज मागे घेण्यासाठी व त्यांची गंगाखेड रेल्वे स्थानकावरील कँटीन चालवू देण्यासाठी त्या तिघांनी पंचसमक्ष 1 लाखाच्या लाचेची मागणी केली होती. या प्रकरणात गंगाखेड येथे पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया गुरुवारी रात्री उशिरापर्यंत चालू होती.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नांदेड विभागाच्या पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, पोलीस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली / पर्यवेक्षण अधिकारी तथा परभणी अँटी करप्शन ब्युरोचे पोलिस उपाधीक्षक भरत हुंबे, सापळा पथकातील पोलीस निरीक्षक अमोल कडू, पोना/अनिल कटारे, अनिरुद्ध कुलकर्णी, शेख मुखीद पोकॉ/सचिन धबडगे , सारिका टेहरे, चापोना चौधरी यांनी ही कारवाई केली.