बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणुक राष्ट्रवादीने मनावर घेतली. तांत्रिक डावपेचात बाजी मारलेल्या राष्ट्रवादीच्या पुढाकाराने राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस अशा तीन पक्षांचा पॅनल तयार झाले. पण, आठ जागांसाठी या महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनलला महिला राखीव मतदार संघातील दोन जागांसाठी उमेदवारच भेटले नाहीत.
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी शनिवारी मतदान होत आहे. १९ संचालकांच्या निवडीसाठी निवडणुक जाहीर झाली. मात्र, तांत्रिक कारणांनी सेवा सोसायटीच्या ११ मतदार संघातील सर्वच उमेदवारी अर्ज बाद झाल्याने केवळ सात मतदार संघाच्या आठ जागांसाठी आता निवडणुक होणार आहे.
भाजपची ताकद आणि सत्ता असलेल्या बँकेच्या निवडणुकीतील डावपेचांत राष्ट्रवादीने बाजी मारली असून रद्द झालेल्या ११ जागांच्या निवडणुका राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडणार असल्याचे मानले जाते. दरम्यान, सदर संचालक मंडळ अल्पकाळाचे ठरणार असल्याचे मानले जात असले तरी सुरुवातीपासूनच राष्ट्रवादीने ही निवडणुक मनावर घेतली आणि त्यांच्यासह शिवसेना, काँग्रेस या महाविकास आघाडीचा शेतकरी विकास पॅनल तयार केला.
पक्षाचे पालकमंत्री धनंजय मुंडे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार बाळासाहेब आजबे, आमदार संजय दौंड असे पाच आमदार आहेत. पण, आठ जागांसाठी त्यांना आठ उमेदवारही उभे करता आलेले नाहीत. महिला राखीव मतदार संघाच्या दोन जागांसाठी या आघाडीचे उमेदवारच रिंगणात नाहीत. आठ जागांसाठी आघाडीचे पतंग चिन्हावर केवळ सहा उमेदवार रिंगणात आहेत. यामागे आघाडीची काही वेगळी खेळी असेल तर ते निकालानंतर समोर येईल. या दोन जागांसाठी तीन उमेदवार रिंगणात असून आघाडी कोणाच्या पारड्यात आपले बळ टाकणार हे पहावे लागेल.