गेवराई, दि. 12 (लोकाशा न्यूज) : गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती एसपींच्या विशेष पथकाला झाल्यानंतर त्या ठिकाणी शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता पथकाने धाड टाकली, या धाडीत आठ ट्रॅक्टरसह वाळू असा एकूण 58 लाख 20 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोदावरी नदी पात्रातून सर्रासपणे अवैध वाळू उपसा होत आहे. खामगाव, सावरगाव घाट येथे अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांच्या विशेष पथकाचे पथकप्रमुख एपीआय विलास हजारे यांना मिळाल्यानंतर त्यांनी शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता सावरगाव घाट येथील गोदावरी नदी पात्रात धाड टाकली असता त्या ठिकाणी त्यांना आठ ट्रॅक्टर मिळून आले. पोलीस दिसताच ट्रॅकटर चालक पसार झाले. पोलीसांनी आठही ट्रॅक्टर ताब्यात घेऊन ते गेवराई पोलीस ठाण्यात आणले. या कारवाईत पथकाने तब्बल 58 लाख 20 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त केलेला सर्व मुद्देमाल गेवराई पोलिस ठाण्यात आणण्यात आला तसेच सदर ट्रक्टर चालक आणि मालक अशा एकूण 16 जणांवर गेवराई ठाण्यात कलम 379,109, 511 सह कलम मो.वा.का. 126/177, 39/192,235 (2)/177 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. एपीआय विलास हजारे यांनी केलेल्या या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.