Uncategorized बीड

किराणा दुकान फोडणार्‍या टोळीचा एलसीबीने लावला छडा, पोलिस निरीक्षक भारत राऊत यांच्या नेतृत्वात केली कारवाई, सव्वा चार लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त


बीड, दि. 28 (लोकाशा न्यूज) : किराणा दुकान फोडून त्यामधील चोरलेल्या सामानाची चोरी बीड शहरात होत असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाला झाल्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी सापळा रचून या टोळीतील दोघांना ताब्यात घेतले आणि पोलिसी खाक्या दाखवताच या चोरट्यांनी नेकनूर, पाटोदा, परळी, धारूरसह इतर ठिकाणी केलेल्या दुकान फोडीची पटापटा माहिती दिली. या प्रकरणात चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून तब्बल 4 लाख 25 हजार रुपयांचे किराणा सामान व वाहन असा एकूण चार लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बीड जिल्ह्यातील नेकनूर, पाटोदा, परळी, धारूरसह आदी तालुक्यात रात्रीच्या वेळी बंद असलेले किराणा दुकान फोडून त्यातील तेलाचे डबे, काजू-बदामसह महाग वस्तू लंपास करत होते. हे चोरटे शनिवारी रात्री चोरलेला माल विकण्यासाठी बीड शहरात माल घेऊन आले होते. त्यापैकी दोघे एक समीर शेख शमोद्दीन व अफजल खॉ उर्फ बब्बु कासिम खान (दोघे रा. बिलालनगर, इमामपूर रोड बीड) हे माल विक्रीसाठी मोठे किराणा दुकान सापडत असताना सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास बार्शी नाका येथेच पोलिसांनी सापळा लावून त्यांना ताब्यात घेतले. त्यांनी प्रथम गुन्हा केल्याचे नाकारले मात्र पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच त्या दोघांनी त्यांच्या साथीदारांमार्फत दि. 17 डिसेंबर 2020 रोजी नेकनूर येथील अझहर ट्रेडिंग, दि. 3 जानेवारी 2021 रोजी पाटोदा येथील आर.के. मॉल, दि. 25 जानेवारी 2021 रोजी धारूर येथील तिरुपती ट्रेडिंग व दि. 30 जानेवारी 2021 परळी येथील जय प्रोव्हीजन या दुकानातून तेलाचे डबे, सुका मेवा व इतर मालाची चोरीची केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरी गेलेल्या एकूण मालापैकी 2 लाख 25 हजार रुपये किमीतचे तेलाचे डबे, सुका मेवा व इतर किराणा सामान तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेले वाहन असा एकूण 4 लाख 25 हजार रुपयांचा माल जप्त केला. दोन्ही आरोपी व मुद्देमाल पोलिस स्टेशन नेकनूर येथे पुढील तपास कामासाठी पोलिस ठाण्यात हजर केले आहे. पुढील तपास किशोर काळे हे करत आहेत. या प्रकरणातील इतर आरोपींचाही शोध सुरू असून लवकरच त्यांच्या मुसक्या आवळल्या जातील, असे स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय भारत राऊत यांनी सांगितले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!