बीड, 19 : गुरूवारी मध्यरात्री बीड जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले. या अवकाळी पावसाने बीड जिल्ह्यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. बहरलेला आंब्याचा मोहर उद्ध्वस्त झाला आहे. फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे, तर रब्बी पिकेही धोक्यात आली आहेत. पाटोदा तालुक्यात पावसामुळे वीस मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहेत.
बीड जिल्ह्यामध्ये गुरूवारी मध्यरात्री गडगडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. जिल्हाभराला अवकाळी पावसाने झोडपून काढले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. वादळी वारे आणि विजेचा कडकडाट मध्यरात्रीपासून सुरू होता. बीडमध्ये मध्यरात्री झालेल्या पावसानंतर वीज पुरवठा काही वेळ खंडीत झाला होता.
धारूर तालुक्यात आवरगाव चिखली, सुकळी, दैठाणा, फकीरजवळा, जैतापूर, मुंगी, कुंडी, या भागामध्ये रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या भागात गुरूवारी रात्री गारपीटही झाली. बोरांच्या आकाराच्या गारांचा वर्षाव झाला. अंबाजोगाई, केज, धारूर, परळी तालुक्यामध्ये रात्री दोन वाजल्यापासून रिमझिम पावसाला सुरूवात झाली. अंबाजोगाई तालुक्यात मध्यरात्री खंडीत झालेला वीज पुरवठा दुपारपर्यंत सुरू झाला नव्हता.
पाटोदा, आष्टी तालुक्यालाही अवकाळी पावसाने अक्षरश: झोडपून काढले. पहाटेपर्यंत अवकाळी पाऊस सुरू होता. पाटोदा तालुक्यातील बेंनसुरा येथे गारव्याने वीस मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. शिरूर तालुक्यात पहाटे पावसाने हजेरी लावली, माजलगाव, वडवणी तालुक्यातही रब्बीसह आंब्याचे नुकसान झाले आहे.
माजलगाव तालुक्यात मध्यरात्री दोन वाजल्यापासून पावसाला सुरूवात झाली. वीज पुरवठा खंडीत झाला. तालुक्यातील नाकलगाव, दिंद्रुड परिसरात अवकाळी पावसाने आणि गारपीटीमुळे ज्वारी, हरभरा, गहू, टरबूज, पपई या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे.
मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाने सुरुवात केल्याने जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. आंब्याचा मोहर गळून पडला आहे. डाळिंब, पपई, द्राक्षे या फळबागांचे नुकसान झाले आहे. काढणीला आलेला गहू भुईसपाट झाला आहे. वातावरणात प्रचंड गारवा असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रूग्णांची संख्या वाढत आहे.