बीड: मागील तीन महिन्यांपासून मराठवाड्यातील १४ साखर कारखान्यांचे गाळप सुरू आहे. आतापर्यंत पाच लाख मे.टन उसाचे गाळप करत माजलगाव तालुक्यातील जयमहेश शुगर अव्वल स्थानी राहिला. कळंब तालुक्यातील रांजणी येथील नॅचरल शुगर कारखान्याने साडेचार लाख मे. टन उसाचे गाळप करत दुसरे स्थान पटकावले. साखर उताऱ्यात मात्र वसमत येथील पूर्णा कारखाना पहिल्या क्रमांकावर आहे.
दोन वर्षांपासून पाऊस चांगला होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी उसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. माजलगाव तालुक्यातील एक खासगी व दोन सहकारी साखर कारखान्यांनी मागील तीन महिन्यांपासून जोरदार गाळप सुरू केले. पवारवाडी येथील जयमहेश शुगर या खासगी कारखान्यात रोज चार हजार ५०० मे.टन एवढे गाळप होत आहे. २२ जानेवारीपर्यंत चार लाख ६८ हजार ५३० मे. टन गाळप करत मराठवाड्यातील १४ कारखान्यांत सर्वांत जास्त उसाचे गाळप करणारा हा कारखाना ठरला. रांजणी येथील नॅचरल कारखान्याना चार लाख ५७ हजार ४३० मे.टन उसाचे गाळप करत, दुसऱ्या स्थानी राहिला. तेलगाव येथील लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना तीन लाख ९३ हजार ६०० मे. टन उसाचे गाळप करत तिसऱ्या स्थानी राहिला.
साखर उताऱ्यात पूर्णा आघाडीवर
मराठवाड्यातील १४ कारखान्यांपैकी वसमत येथील पूर्णा कारखान्याचा साखर उतारा हा सर्वांत जास्त १०.५५ एवढा आहे. त्याखालोखाल नांदेड येथील बळीराजा कारखान्याचा साखर उतारा १०.३२ व बागेश्वरी येथील श्रद्धा कारखान्याचा साखर उतारा १०.१२ आहे.
मराठवाड्यातील कारखान्यांचे गाळप
समर्थ कारखाना (महाकाळा) तीन लाख ७८ हजार ६३० मे.टन , बळीराजा (नांदेड) तीन लाख ३५ हजार ७०० मे.टन , येडेश्वरी (सारणी) तीन लाख २१ हजार ३७० मे.टन, ट्वेन्टी वन शुगर (सायखेडा) दोन लाख ७७ हजार ३५५ मे.टन, श्रद्धा (बागेश्वरी) दोन लाख ५२ हजार १० मे.टन , जयभवानी(गढी ) दोन लाख ३५ हजार ५८१ मे.टन, सागर (तीर्थपुरी) दोन लाख ३० हजार ७०० मे.टन, पूर्णा (वसमत) दोन लाख २७ हजार ४१० मे.टन, भाऊराव (नांदेड) दोन लाख १४ हजार ९८० मे.टन, छत्रपती (सावरगाव) एक लाख ७९ हजार ९१० मे.टन, योगेश्वरी (लिंबा) एक लाख ३६ हजार ७२७ मे. टन.