राज्यातील १२,७११ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणीदरम्यान अनेक धक्कादायक निकाल समोर येत आहेत. या निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्का देणारे निकाल समोर आले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही सांगली जिल्ह्यामधील म्हैसाळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपाने दणका दिलाय. या ग्रामपंचायतीमध्ये मुसंडी मारली आहे. जयंत पाटील यांची सासरवाडी अशणाऱ्या म्हैसाळमधील १७ ग्रामपंचायतींच्या जागांवर पाटील यांचे सासरवाडीचे नातेवाईक म्हणजेच पाहुणे राऊळे उभे होते. मात्र राऊळेंचा पराभव झाला असून भाजपाने येथे एकतर्फी विजय मिळवलाय.
म्हैसाळमध्ये भाजपाने १७ पैकी थेट १५ जागांवर विजय मिळवला असून राष्ट्रवादीला केवळ दोन जागांवर विजय मिळवलाय. भाजपाच्या या विजयामुळे म्हैसाळमध्ये सत्तांतर झालं आहे. भाजपाने इथं एकहाती सत्ता मिळवलीय. प्रदेशाध्यक्षांच्या सासरवाडीतच मोठा पराभव झाल्याने राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मारला जातोय. जयंत पाटील यांचे मेहुणे मनोज शिंदे यांची प्रतिष्ठा या निवडणिकीमध्ये पणाला लागली होती. मात्र पाटील यांचे धाकडे मेहुणे, मोठ्या मेहुण्याची पत्नी आणि मेहुण्याची मुलगी असे सासरवाडीतील चारही उमेदवार पराभूत झालेत.