मुंबई : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे अडचणीत सापडले आहेत. मुंबईतील एका महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप केला. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी बलात्काराचा आरोप तर खोडून काढला, मात्र त्या महिलेसोबत आपले परस्पर संमतीने संबंध असल्याचं मान्य केलं आहे. या सगळ्या घटनाक्रमानंतर भाजपचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत.
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी बलात्कार आरोप प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ‘महाराष्ट्रातील एका कॅबिनेट मंत्र्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत. धनंजय मुंडे स्वत:च कबूल करत आहेत की माझी एक पत्नी, दुसरी बायको आणि आता तिसरी महिला आरोप करते…जोपर्यंत या सगळ्या प्रकरणातून ते मुक्त होत नाहीत, तोपर्यंत त्यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राहण्याचा कोणताही अधिकार नाही,’ असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
नक्की काय आहे प्रकरण?
धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल झाल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मात्र या सगळ्या आरोपांवर आता स्वत: धनंजय मुंडे यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे. करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो, असं मुंडे यांनी म्हटलं आहे. मात्र यावेळी त्यांनी बलात्काराचे आरोप खोडून काढले आहेत.
‘2019 पासून करूणा शर्मा त्यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जीविताला गंभीर शारीरिक इजा करण्याच्या, धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी होता,’ असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे.
हे संपूर्ण प्रकरण हे ब्लॅकमेलिंग करणारे, खोटे व बदनामी करण्याच्या हेतूने घडवून आणण्यात आलेले आहे, त्यामुळे यात अशा आरोपांवर विश्वास ठेवू नये ही विनंती, असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.