बीड

‘फोन पे’वरून युवकाला लाख रुपयांना गंडविले, शिवाजी नगर ठाण्यात गुन्हा दाखल

बीड : ‘फोन पे’वरून पाठविलेले पाच हजार रुपये खात्यावर जमा झाले नाहीत. त्यामुळे बीडच्या युवकाने इंटरनेटवरून अनवधानाने ‘फोन पे’ च्या बनावट कस्टमर केअरचा नंबर घेतला. त्यानंतर भामट्याने चुकीची माहिती देत त्या युवकाच्या खात्यावरून एक लाख रुपये काढून घेतल्याची घटना उघडकीस आली आहे.

फसवणुकीचा हा प्रकार १४ डिसेंबर रोजी घडला. बाजीराव सुंदर जाधव (रा. संत नामदेव नगर, धानोरा रोड, बीड) असे त्या युवकाचे नाव आहे. त्याचा भाऊ दत्ता मोहन जाधव याने १४ डिसेंबर रोजी बाजीरावच्या फोन नंबरवर पाच हजार रुपये पाठवले होते. परंतु ही रक्कम बाजीरावला ,मिळाली नाही. त्यामुळे त्याबाबत तक्रार करण्यासाठी त्याने इंटरनेटवर फोनपे च्या कस्टमर केअरचा नंबर शोधला असता त्याला फोनपेच्या बनावट कस्टमर केअरचा नंबर मिळाला. त्या नंबरवरून बोलणाऱ्या राहुलकुमार या भामट्याने बाजीरावला बोलण्यात गुंतवून आधी त्याच्या खात्यावरील शिल्लक रक्कम विचारून घेतली. त्यानंतर बाजीरावला चुकीची माहिती देत फोन पे द्वारे त्याच्या खात्यातून ९८ हजार ८५२ रुपये काढून घेतले आणि २४ तासात ही रक्कम पुन्हा खात्यावर जमा होईल असे सांगितले. परंतु, आठ दिवसानंतरही पैसे जमा न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे बाजीरावच्या लक्षात आले. याप्रकरणी बाजीराव जाधव याच्या फिर्यादीवरून राहुलकुमार नामक भामट्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरिक्षक ठोंबरे करत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!