मुंबई दि. १५ —— राज्य सरकारने ‘उमेद’ अभियानातील महिलांना न्याय द्यावा, अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केली आहे. या मागणीसाठी आंदोलन करणा-या महिलांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका असे सांगत त्यांनी या लढ्याला आपला पाठिंबा व्यक्त केला आहे.
८४ लाख कुटुंबांसाठी काम करणाऱ्या उमेद अभियानाचे खासगीकरण थांबवावे या प्रमुख मागणीसाठी ग्रामीण भागातील हजारो महिलांचा मोर्चा मुंबईत धडकला आहे. आझाद मैदानात या महिलांनी आजपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाची दखल घेऊन पंकजाताई मुंडे यांनी फेसबुक पेजवरून उमेदच्या महिलांची बाजू सरकार समोर मांडली आहे.
आमच्या सरकारच्या काळात उमेद अभियानातील महिलांना न्याय देण्याचं काम आम्ही केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कामाची दखल घेतली होती, त्यांनी अभियानातील महिलांशी ऑनलाईन संवादही साधला होता. तसेच यवतमाळ व औरंगाबाद येथे लाखो महिलांच्या मेळाव्याला संबोधितही केले होते. उमेदने आपल्या कामातून राज्याला अनेक पहिल्या – दुसऱ्या क्रमांकाचे पुरस्कारही मिळवून दिले आहेत. लाखो गरीब- वंचित महिलांना आपल्या पायावर उभ्या केलेल्या उमेदचे बाजारीकरण सरकारने तात्काळ थांबवावे अशी मागणी त्यांनी केली. मागील चार महिन्यांपासून या महिला आपल्या न्याय मागण्यांसाठी व अस्तित्वासाठी रस्त्यावर उतरून लढा आहेत, सरकारने त्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये असेही त्यांनी म्हटले आहे.
••••