पाटोदा, दि. २८ (लोकाशा न्यूज) : तालुक्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे झालेले नुकसान, लॉकडाऊन च्या काळात तिन एकरातील भाजीपाल्यात अपेक्षित उत्पन्न न मिळणे व एक लाखाची घेतलेली संकरित गाय एक आजाराने मरण पावल्याने आलेल्या नैराश्येतून बेंनसुर ता पाटोदा येथील युवक मंगेश कैलास आरसुळ वय 27 या युवकाने शेतातील झाडाला फाशी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. या हृदयद्रावक घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
बेनसुर तालुका पाटोदा येथील मंगेश कैलास आरसुळ या युवकास शेतीमध्ये रस होता. लॉक डाऊनच्या काळात तीन एकर शेतीमध्ये मंगेशने टोमॅटो, मिरची व वांग्याचे पीक घेतले मात्र लोक डाऊनच्या काळामध्ये हे पीक बाहेर पाठवता न आल्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळू शकले नाही, त्याचप्रमाणे मंगेश याने एक लाख रुपये किंमतीची संकरित गाय दूध धंद्यासाठी खरेदी केली. मात्र एका आजाराने या गायीचाही मृत्यू झाला. त्यातच आठ -दहा दिवसापूर्वी शेतातील सोयाबीनचे पीक काढले आणि त्याच रात्रीपासून पाऊस लागल्या पूर्ण सोयाबीन पाण्यात गेले. या सर्व कारणांमुळे निराश झालेल्या मंगेश आरसुळ यांने 28 सप्टेंबर रोजी पहाटे पाचच्या दरम्यान शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण बेनसुरमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बेनसुरचे ग्रामपंचायत सदस्य भरत भरत विठ्ठल आरसुळ यांनी पाटोदा पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार पोलीस हेडकॉन्स्टेबल श्री भोसले, श्री घुमरे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मंगेशचे प्रेत उत्तर तपासणीसाठी पाटोदा रुग्णालयात पाठविले होते. प्रेताची उत्तर तपासणी झाल्यानंतर प्रेत ताब्यात देण्यात आले. अखेर ह्रदयद्रावक अंतकरणाने बेनसुरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.