आपत्तीग्रस्त काळात काही लोक कोरोनाग्रस्तांना आवश्यक असणार्या रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार करत आहेत. कोरोना महामारीच्या काळात असा काळाबाजार करणार्यांना नियतीच त्याची शिक्षा देईल असे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी येथे केले.
शहरातील उर्दू हायस्कूलमध्ये मुस्लीम समाजातर्फे सुरु करण्यात आलेल्या हकीम लुकमान कोविड सेंटरचे उद्घाटन त्यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. मंत्री पाटील म्हणाले, पाच ते सात हजार रूपयांपर्यंत मिळणारे रेमडेसिव्हीर इंजेक्शन काळ्या बाजारात पंधरा हजार रूपयांना विकले जात असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातीलच काहींचा सहभाग असल्याचे समजले आहे. योग्य वेळ आल्यावर त्यांचा हिशेब चुकता केला जाईल. शिवाय नियतीच त्यांना त्यांच्या या कृत्याची शिक्षा देईल. असेही मंत्री पाटील यावेळी म्हणाले.