बीड

आरक्षणावर स्थगिती येताच पोलीस भरतीचा घाट नेमका कोणी घातला.? भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केंचा सवाल


बीड, दि. 17 : मराठा आरक्षणाला मा. न्यायालयाने स्थगिती देताच राज्य शासनाने तातडीने मेगाभरती जाहीर केली. पोलीस विभागातील 12538 जागा भरतीची प्रक्रिया सुरू करून एक प्रकारे मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळले आहे. या निर्णयामुळे मराठा समाजातील तरुण मुलांच्या भवितव्यावर मोठा दुष्परिणाम होणार आहे. मराठा तरुणावर सरकार कडून हा जाणीवपूर्वक अन्याय होणार आहे.पोलीस भरतीच्या निर्णयामुळे समाजामध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. मराठा तरुणांचे भवितव्य लक्षात घेता मराठा आरक्षणाचा निर्णय होई पर्यंत शासनाने पोलीस भरती थांबवावी. शिवाय ईतर कोणतीही नोकर भरती करू नये असे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले आहे.
गेल्या पंचवीस तीस वर्षाच्या मराठा संघर्षाला यश आले होते. मराठा समाजातील तरुणांना आपले उज्वल भविष्य दिसू लागले होते. अनेक पात्र व गरजवंत तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत होते. परंतु तिघाडी सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षपणा मुळे न्यायालयात आरक्षण टिकवण्यात अपयश आले. मराठा आरक्षणाच्या आजवरच्या न्यायालयीन लढाईत आरक्षणाला स्थगिती मिळाली नव्हती परंतु दुर्दैवाने आज थेट आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने मराठा तरुणांचे नोकरीतील प्रवेशद्वार बंद झाले. न्यायालयाच्या निर्णया नंतर काही तासांमध्येच पोलीस भरतीचा घाट घातला गेला. मराठा तरुणावर अन्याय करून भरती करण्याची घाई आघाडी सरकारमधील कोणत्या नेत्यांना झाली. हा प्रश्न समाजामध्ये निर्माण झाला आहे. या निर्णयामुळे समाजात संतप्त भावना निर्माण झाली असून आघाडी सरकार जाणीवपूर्वक मराठा तरुणांना भवितव्या पासून उपेक्षित ठेवू इच्छिते असा संदेश पोलीसभरतीतून मिळाला आहे. सरकारमधील काही घटक मराठा समाजाला अडचणीत आणण्याचे षड्यंत्र रचत आहेत. त्याचाच परिपाक म्हणून तातडीची पोलिस भरती जाहीर करून मराठा समाजाला डिवचण्याचा प्रयत्न केला गेला.मराठा समाजाला या कुटील हालचाली सर्वज्ञात आहेत. आघाडी सरकारला मराठा समाजाविषयी खरेच आस्था आणि काळजी असेल तर मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत तातडीने पोलीस भरती थांबवावी. ज्यांना कायदेशीरपणे कोर्टात आरक्षण टिकवता आले नाही. ते सरकार मराठा समाजाचा 13 टक्के वाटा अबाधित ठेवू शकत नाही. समाज सरकारवर विश्वास ठेवू शकत नाही.त्यामुळे या सरकारने मराठा समाजाच्या संतप्त भावना लक्षात घेऊन ही पोलीस भरती तात्काळ थांबवावी अन्यथा आपल्या न्याय मागण्यासाठी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा राजेंद्र मस्के यांनी दिला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!