बीड, दि. 31 (लोकाशा न्यूज) : काल परळीत एका सहा वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली होती. या घडलेल्या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी आपली पोलिस यंत्रणा सतर्क केली. त्यामुळे अवघ्या पाच तासाच्या आतच या घटनेतील नराधमाला बेड्या ठोकण्यास पोलिसांना यश मिळाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की काल दि. 31 ऑगस्ट 2025 रोजी पंढरपूर येथुन एक कुटुंब मुलाबाळांसह परळी येथे आले होते. दुपारी 15:00 वाजेच्या सुमारास रेल्वे स्टेशनवरच जेवण करून सदरचे कुटुंब झोपी गेले होते. दरम्यान रेल्वे स्टेशन परळी येथे एक आरोपी नराधम याने पिडीत बालिकेला (वय वर्ष 6) रेल्वे स्टेशन वरील उड्डानपुलाकडे घेवुन जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडलेली आहे. लैंगिक अत्याचार करुन आरोपी फरार झाला होता. सदर घटनेची माहिती मिळताच संभाजीनगर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पोलिस अधीक्षकांना माहिती दिली. त्यावरून सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना केले. सहाय्यक पोलीस अधीक्षक, पोलीस स्टेशन संभाजीनगर, स्था.गु.शा. यांनी अथक परिश्रम करून घटना घडल्यानंतर सर्व तांत्रीक बाबी तपासून 05 तासांच्या आत आरोपी निष्पन्न करुन आरोपीस तात्काळ अटक केली आहे.