बीड, दि. 14 (लोकाशा न्यूज) : अंमली पदार्थांविरोधात बीड पोलिसांनी 13 ते 17 ऑगस्ट यादरम्यान अभियान सुरू केले आहे. त्यानुसार येत्या 17 ऑगस्ट रोजी बीडमध्ये मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. ही मॅरेथॉन म्हणजे कोणतीही शर्यत नाही, बीडला नशामुक्त करण्यासाठी ही मॅरेथॉन आहे. त्यामुळे या मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी केले आहे. आपली उपस्थिती हीच या मोहीमेची खरी ताकत असल्याचे एसपींनी म्हटले आहे.
तरुण पिढी अमली पदार्थांच्या विळख्यात अडकू नये, यासाठी शासनाच्या निर्देशानुसार बीड पोलिसांनी अमली
पदार्थाविरोधात विशेष अभियान सुरू केले आहे. 13 ऑगस्टपासून या अभियानाला जिल्ह्यात सुरूवात झाली आहे. या अभियानाअंतर्गत मोठ्या प्रमाणात जनजागृती उपक्रम हाती घेण्यात आलेले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यंांच्या नेतृत्वात विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये कार्यशाळा घेण्यात येत आहेत. तसेच रॅली आणि पथनाट्याद्वारे व्यापक जनजागृतीही केली जात आहे. तसेच येत्या 17 ऑगस्ट रोजी बीडमध्ये पहाटे पाच वाजता शहरातील छ. संभाजी महाराज क्रिडांगणातून मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. ही मॅरेथॉन पाच आणि दहा किलो मिटरची असणार आहे. ही कोणतीही स्पर्धा नसून बीडला सर्वांनी मिळून नशामुक्त करण्यासाठी या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आपल्या कुटूंबासोबत, आपल्या मित्रांसोबत या मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी केले आहे. आपला या मॅरेथॉनमध्ये सहभाग हीच या मोहिमेची खरी ताकत असल्याचेही यावेळी एसपींनी म्हटले आहे.















