बीड, दि.26 (लोकाशा न्यूज) : क्लासेसमध्ये शिक्षण घेणार्या मुलींची सुरक्षा नेमकी कोण करणार? आता असाच प्रश्न निर्माण होत आहे. कारण जिल्ह्यातील शैक्षणिक संकुल समजल्या जाणार्या उमाकिरणमधील दोन शिक्षकांवर शिवाजी नगर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका अल्पवयीन मुलीसोबत केलेल्या गैरकृत्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे बीडच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून गुरू शिष्याच्या नात्यालाही काळिमा फासला गेला आहे.
बीड जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी कोचिंग क्लासेसचे एकमेव ठिकाण अशी ओळख उमाकिरणच्या वतीने करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे क्लास एकाच छाताखाली सुरु करण्यात आले होते. या क्लासेसमध्ये येत असलेल्या एका अल्पवयीन मुलीसोबत जुलै 2024 पासून सातत्याने गैरकृत्य होत होते. चाललेला हा सगळा प्रकार उघडकीस आणूनही त्यावर क्लासेसवाल्यांकडून कोणतीच कारवाई होत नव्हती. त्यामुळे सदर पीडित मुलीने आपल्या सोबत घडत असलेल्या घटनेची माहिती
आपल्या पालकांना दिली, त्यानंतर त्यांनी हा सगळा प्रकार पोलिसांच्या कानी घातला. त्यावर पींक पथकाचे एपीआय लांडगे यांनी याप्रकरणाची तात्काळ दखल घेवून कारवाई केली. सदर अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून काल सायंकाळी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय पवार आणि प्रशांत खटावकर असे या गुन्ह्यातील आरोपीची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या गुन्ह्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.