बीड

सव्वा दोन कोटींच्या अपहारात अखेर पंधरा घोटाळेबाज अडकलेच, अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल, पंधरा घोटाळेबाजांमध्ये अंबाजोगाई डीसीसी बँकेच्या दहा जणांचा समावेश, कुरेशी मुजीब अहेमद अब्दुल रहिम  घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार  


बीड, दि. 30 (लोकाशा न्यूज) : सव्वा दोन कोटी रूपयांच्या अपहारात अखेर पंधरा घोटाळेबाज अडकले आहेत. याप्रकरणी अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या पंधरा घोटाळेबाजांमध्ये अंबाजोगाई डीसीसी बँकेच्या दहा जणांचा समावेश आहे. या घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार सानेगुरुजी शिक्षक सहकारी पतसंस्था संस्थापक अध्यक्ष कुरेशी मुजीब अहेमद अब्दुल रहिम  हा आहे. दरम्यान याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
अंबाजोगाई येथील स्वामी विवेकानंद शिक्षक सहकारी पतसंस्था वेगवेगळ्या घोटाळ्यांमुळे चांगलीच गाजत आहे. मागच्या काही दिवसांपुर्वीच या बँकेतील सहा कोटी दहा लाख रूपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. याप्रकरणी अंबाजोगाई शहर ठाण्यात 27 घोटाळेबाजांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी 2 कोटी 29 लाख 93717 रूपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. चाचणी लेखापरीक्षण अहवाल 2000 ते 2012  नुसार  या पतसंस्थेत 2 कोटी 29 लाख 93717 रुपयांचा अपहार घोटाळेबाजांनी स्वतः च्या फायद्यासाठी केला आहे. या घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार सानेगुरुजी शिक्षक सहकारी पतसंस्थेचा संस्थापक अध्यक्ष कुरेशी मुजीब अहेमद अब्दुल रहिम हा आहे. स्वामी विवेकानंद शिक्षक सहकारी पतसंस्थेत 2 कोटी 29 लाख 93717 रूपयांचा घोटाळा करून कुरेशी मुजीब अहेमद अब्दुल रहिम याने सानेगुरुजी शिक्षक सहकारी पतसंस्था स्थापन केल्याचे सांगितले जात आहे. कुरेशी बरोबरच या गुन्ह्यात सानेगुरुजी शिक्षक सहकारी पतसंस्थेचा  माजी अध्यक्ष भोसले विकास प्रभाकर, प्रभाकर नरबा आरसुडे, महादेव मुकुंदराव मुंडे, षिवहर महादेव अप्पा आकुसकर यांच्या सह 15 जणांवर अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात  शासकीय लेखापरीक्षण सतिश पोकळे यांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे पंधरा पैकी दहा जण हे अंबाजोगाई डीसीसी बँकेतील कर्मचारी आहेत. यामध्ये एस.एस. लांडगे (अकॉऊंट), यु.डी.देशमुख (इन्स्पेक्टर), ए.एस. पवार (लिपीक), एम.एस. सावरे (लिपीक), एम.आर. कदम (लिपीक), बी.एस.बांगर (सिनियर इन्स्पेक्टर), के.एम. केकान (लिपीक), यु.एस. नागरगोजे (लिपीक), एस.आर. खाडे (एजंट)आणि ए.एन. वाभळे (लिपीक) याचा समावेश आहे. आयपीसी 406,409 आणि 34 भादविनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आतापर्यंत स्वामी विवेकानंद पंतसंस्थेमधील आठ कोटीहून अधिकचा घोटाळा उघडकीस आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!