बीड

शिक्षण विभागातील नव्या घोटाळ्याचे धागेदोरे लागले सीईओंच्या हाती !सीईओंची परवानगी न घेताच बदलीच्या पोर्टलवर शिक्षकांचे बदलले विषय, कर्तव्यात कसूर केल्याबद्दल आदित्य जीवने शिक्षणाधिकार्‍यांवर करणार कारवाई, कारवाईच्या अनुषंगाने पाठविली लेखी नोटीस


बीड, दि. 30 (लोकाशा न्यूज) : बीड झेडपीच्या शिक्षण विभागातील नवनवे घोटाळे सातत्याने उघडकीस येत आहेत. आता अशाच आणखी एका नव्या घोटाळ्याचे धागेदोरेच सीईओ आदित्य जीवने यांच्या हाती लागले आहेत. कारण परवानगी अवश्यक असतानाही सीईओंची परवानगी न घेताच बदलीच्या पोर्टलवर 22 शिक्षकांचे विषय बदलण्यात आले आहेत. ही पुर्णपणे अनियमितता असून आता यावर सीईओ आदित्य जीवने यांनी कडक भुमिका घेतली आहे. त्याअनुषंगानेच आता श्री. जीवने यांच्याकडून शिक्षणाधिकारी भगवान फुल्लारी यांच्यावर कारवाई होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यानुसारच सीईओंनी शिक्षणाधिकार्‍यांना लेखी नोटीस बजावली आहे. दरम्यान शिक्षण विभागातील असे सगळे घोळ आर्थिक व्यवहारातूनच होत असल्याचीही चर्चा झेडपीतून ऐकायला मिळत आहे.
बीड झेडपीच्या शिक्षण विभागात सध्या घोटाळ्यांवर घोटाळे होत आहेत. टीईटीमध्ये घोटाळा करणार्‍या शिक्षकांनाही सायबर विभागाकडून तपासणी न करताच सेवेत समावून घेतल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आलेला आहे. त्याचबरोबर शिक्षण विभागातील आता आणखी एक नवा घोटाळा उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे याचे धागेदोरेच सीईओ आदित्य जीवने यांच्या हाती लागले आहेत. प्राथमिक शिक्षक जिल्हांतर्गत बदली सन 2025 नियमानुसार कार्यवाही न करता शिक्षणाधिकारी भगवान फुल्लारी यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे स्पष्टपणे समोर येत आहे. 22 शिक्षकांचे विषय शासन निर्णयानुसार मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची परवानगी घेवूनच बदल करणे आवश्यक  आहे. त्याबदलानुसार संबंधिताचे बदली पोर्टलवर गणीत विज्ञान या विषयाची नोद करणे आवश्यक होते. तरीही शिक्षणाधिकारी भगवान फुल्लारी यांनी सीईओंच्या परवानगीशिवाय 22 पदविधर शिक्षकांच्या गणित/विज्ञान हा विषय ऑनलाईनवर बदलला आहे. ही गंभीर अनियमितता करून कर्तव्यात कसूर केला आहे. त्यामुळेच आता शिक्षणाधिकारी कारवाईच्या अनुषंगाने सीईओंच्या रडारवर आले आहेत. यासंदर्भात सीईओंनी शिक्षणाधिकार्‍यांना लेखी नोटीस काढून खुलासा मागविला आहे. आपली सदरची कृती ही महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 मधील नियम 3 चा भंग करणारी असून आपणाविरूध्द महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 मधील तरतूदीनुसार शिस्तभंगाविषयक कार्यवाहीचा प्रस्ताव शासनास का सादर करण्यात येवू नये, असा स्पष्ट ईशारा सीईओंनी दिला आहे. याबाबत असमाधानकारक उत्तर आल्यास शिक्षणाधिकार्‍यांवर कारवाईच होणार आहे. दरम्यान या नव्या घोटाळ्यामुळे पुन्हा एखदा बीड झेडपीचा विभाग चर्चेत आला आहे.

या 22 शिक्षकांचे विषय परस्पर
बदलले
22 शिक्षकांचे विषय परस्पर बदलण्यात आले आहेत. यामध्ये ज्ञानेश्वर दत्तात्रय दहिवले (शाळा कोतन), बाळासाहेब पांडूरंग कराड (शाळा वारंदळवाडी), शिवशंकर विठ्ठलराव वरखंटे (शाळा उमरद जहाँगीर), संतोष भाऊराव भाबड (शाळा घाटशिल पारगाव), विश्वनाथ काशीनाथ मुंडे (शाळा भवानवाडी), सुराट अनंतराव गहाळे (शाळा पालवे महदवस्ती), सखाराम सहदेव शिंदे (शाळा अशोक नगर), अरूण रामकिसन मिसाळ (शाळा हावरसिंगा), सतीश शहदेव गावडे (शाळा पिंपळवाडी), सुदर्शन अभिमन्यू कैफ (मैंदवाडी), कल्पना रामराम झिंजे (शाळा अंबोरा), संगिता दामोधर सपकाळ ( शाळा उमरद जहॉगीर), नितीन दत्तात्रय सरवदे (शाळा वहीरा), शिवशंकर विठ्ठलराव वखरे (शाळा उमरद जहागीर), संतोष सुधाकर गर्जे (शाळा दहिफळवस्ती मानूर), वंदना सोपनराव गुनसुंद्रे (शाळा केंद्रेवाडी), शोभना विश्वनाथ सातव (शाळा कडा), शेषेराव बन्सी चव्हाण (शाळा कारी) या शिक्षकांचे सीईओंची परवानगी न घेताच विषय बदलण्यात आले आहेत. यामागे मोठे आर्थिक गणीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच आता याप्रकरणी दोषी अधिकार्‍यांवर सीईओंकडून कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!