
बीड (प्रतिनिधी) – बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आज जिल्हा रुग्णालयाची अचानक पाहणी करत रुग्णसेवा, वैद्यकीय सुविधा आणि व्यवस्थापनाची सखोल माहिती घेतली. त्यांनी रुग्णालयातील विविध विभागांना भेट देऊन रुग्णांशी आणि कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधला.
पाहणी दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी ओपीडी, इनडोअर वॉर्ड, औषध वितरण कक्ष, ऑपरेशन थिएटर, महिला व बालरोग विभाग, तसेच प्रयोगशाळा विभागांची तपासणी केली. रुग्णांकडून उपचार, औषधे, स्वच्छता आणि कर्मचारी वर्गाच्या वागणुकीबाबत थेट माहिती घेतली. काही रुग्णांनी समाधान व्यक्त केले तर काहींनी किरकोळ अडचणी मांडल्या.
जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाला सूचना दिल्या की, प्रत्येक रुग्णाला दर्जेदार सेवा मिळायला हवी. त्यांनी यंत्रणांमध्ये पारदर्शकता, वेळेवर उपचार आणि स्वच्छतेवर भर देण्याचे निर्देश दिले.
या पाहणीत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय राऊत, आरएमओ डॉ. संतोष शहाणे, बाह्य विभागाचे आरएमओ डॉ. लक्ष्मीकांत, डॉ. हनुमंत पारखे, मुख्य अधीसेविका रमा गिरी, प्राचार्य डॉ. सुवर्णा बेदरे आणि इतर विभागप्रमुख उपस्थित होते.
पाहणीच्या शेवटी जिल्हाधिकाऱ्यांनी चांगली सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक करून त्यांना शाब्बासकी दिली. काही विभागांमध्ये तातडीने सुधारणा करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या पाहणीमुळे आरोग्य यंत्रणेत जागरूकता वाढणार असून, नागरिकांना अधिक चांगल्या सेवा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या सूचनांचे तात्काळ पालन करण्याचे आश्वासन दिले आहे.