बीड, दि.13 (लोकाशा न्यूज) : रविवारी सायंकाळी येथील पांगरी रोड भागातून एका नऊ वर्षीय शाळकरी मुलाचे अपहरण करण्यात आले होते. या घटनेने बीड शहरात मोठी खळबळ उडाली होती. सायंकाळी 6 च्या सुमारास ही घटना घडली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी आपली यंत्रणा हलविली, त्यानंतर अवघ्या तासाभरातच स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस कर्मचारी अशोक दुबाले, मुन्ना वाघ, शिवाजीनगरसह सायबरच्या पोलिस कर्मचार्यांनी याप्रकरणाचा तपास गतिमान करत आरोपीला बेड्या ठोकल्या आणि अपहरण झालेल्या मुलाची सुटका केली. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या नेतृत्वात केलेल्या बीड पोलिसांच्या या कामगिरीचे बीडसह संपूर्ण जिल्हाभरातून कौतूक करण्यात येत आहे.
रविवारी सायंकाळी पांगरी रोड भागातून एका 9 वर्षीय मुलाला जगदीश गायकवाड (रा.अंबिका चौक) या आरोपीने अपहरण करून पळविले होते. आरोपी बीड बसस्थानकाकडे आला होता. सदर मुलाच्या वडिलांना फोन करून खंडणीखोर गायकवाडने पाच लाखांची मागणी देखील केली होती. या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. या सगळ्या प्रकाराची माहिती नातेवाईकांनी थेट पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांना फोन करून दिली. त्यानंतर त्यांनी तात्काळ अॅक्शन घेत आपली यंत्रणा हलविली, पुढे स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस कर्मचारी अशोक दुबाले, मुन्ना वाघ तसेच शिवाजीनगर ठाण्याच्या पोलिस कर्मचार्यांबरोबरच सायबरच्या पोलिसांनी सापळा रचून आरोपीच्या हातात बेड्या ठोकल्या. दरम्यान अवघ्या तासाभरातच बीड पोलिसांनी सदर मुलाची सूटका करत मोठी कामगिरी केली आहे. स्वत: पोलिस अधीक्षक या संपूर्ण घटनेवर बारीक लक्ष ठेवून होते. विशेष म्हणजे रात्री उशीरापर्यंत शिवाजीनगर ठाण्यात बसून होते. यावेळी अपहरण झालेल्या मुलाची सुटका करून सदर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सदर आरोपीवर यापुर्वीही चोरी, खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्यावर आम्ही कडक कारवाई करणार असल्याचे यावेळी पोलिस अधीक्षकांनी सांगितले. ही कामगिरी पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उस्मान शेख, शिवाजीनगरचे पोलिस निरीक्षक मारूती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.