बीड जिल्ह्यातील गुन्हांची प्रकरण संपता संपत नाहीत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एका व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. गुंड सतीश भोसले हा एका व्यक्तीला अमानुषपणे बेदम मारहाण करत असल्याचं या व्हिडिओ व्हायरल झाला होता. आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश ऊर्फ खोक्या भोसले हा सहा दिवसांपासून फरार होता. त्याला प्रयागराजमधून बीड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला शिरूरकासार तालुक्यातील बावी येथे आणून पाच ते सहा जणांनी अर्धनग्न करून बॅटने मारहाण केली होती. यात पोलिसांनी स्वत: तक्रार देऊन गुन्हा दाखल केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दिलीप ढाकणे व महेश ढाकणे या बापलेकाला मारहाण केल्याचाही व्हिडीओ व्हायरल झाला. याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले. त्यानंतर लगेच वनविभागाने खोक्याच्या घरी छापा मारून तपासणी केली.
यावेळी वाळलेले मांस आणि शिकारीचे साहित्य जप्त केले. या सर्व गुन्ह्यांमध्ये खोक्या हा पोलिसांना हवा होता. हाच फरार खोक्या टीव्ही चॅनेलवर लाईव्ह मुलाखत देत होता, अखेर या खोक्याला बेड्या ठोकलण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी ही माहिती दिली.
सतीश भोसले याचे मारहाणीचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बीडच्या गुन्हेगारीची चर्चा पुन्हा एकदा राज्यभर सुरू झाली. सतीश भोसले या तरुणाने कैलास वाघ या व्यक्तीला मारहाण केल्याचे समोर आले. सतीश भोसले हा भाजपा आमदार सुरेश धस यांचा जवळचा कार्यकर्ता असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर केल्या होत्या.
काही दिवासापासून बीड पोलिसांची पथक सतीश भोसले याच्या मागावर होते. काल भोसले याने काही वृत्तवाहिनींना प्रतिक्रिया दिली होती. यावरुन विधिमंडळात सवाल उपस्थित करण्यात आला होता. दरम्यान, आज पालिसांनी प्रयागराजमधून सतीश भोसले याला अटक केली आहे.