बीड

रेल्वे विषयी धारूर-वडवणी तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी घातले डॉ. प्रितमताई मुंडे यांना साकडे, सर्व विभागाची संयुक्त बैठक बोलवण्यासाठी प्रितमताईंचे पंकजाताईंसह संबंधितांना पत्र, प्रलंबित प्रश्न मार्गी लागून प्रकल्पाला मिळणार गती


दिंदृड | दि. ०६ | नगर-बीड-परळी रेल्वे मार्गातील वडवणी आणि धारूर तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी माजी खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांची भेट घेतली. रेल्वे प्रकल्पाकरिता संपादित करण्यात आलेल्या जागेची संपादन प्रक्रिया तसेच मावेजा संदर्भात उद्भवत असलेल्या समस्या यावेळी शेतकऱ्यांनी प्रितमताई मुंडे यांच्या समक्ष मांडल्या.

बीड जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा असलेला नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्प पूर्णत्वाकडे जात असताना वडवणी आणि धारूर तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांमुळे प्रकल्पाचे काम मंदावले होते. भूसंपादन प्रक्रियेत वारंवार उद्भवनाऱ्या अडचणी तसेच मावेज्या संदर्भातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी प्रितमताईंची भेट घेऊन समस्या सोडवण्यासाठी साकडे घातले. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्यानंतर डॉ.प्रितमताई मुंडे यांनी यासंदर्भात राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी आपल्या स्तरावरून सर्व संबंधितांना संयुक्त बैठक आयोजित करण्याच्या सूचना करण्याची विनंती केली आहे.

तसेच स्थानिक उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांशी प्रितमताई मुंडे यांनी दूरध्वनीद्वारे संवाद साधून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. या रेल्वे प्रकल्पाला गती देण्यासाठी जिल्ह्याच्या महसूल, भूसंपादन, रेल्वे आणि कृषी विभागाने प्रकल्पक्षेत्र असलेल्या गावांमध्ये संयुक्त बैठक आयोजित करून शेतकऱ्यांच्या भूसंपादन आणि मावेज्यासंदर्भातील अडचणीचा जागेवर निपटारा करावा अशी मागणी देखील प्रितमताई मुंडे यांनी केली. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रितमताई मुंडे यांनी होणाऱ्या संयुक्त बैठकीस उपस्थित राहावे असा आग्रह याप्रसंगी शेतकऱ्यांनी त्यांना केला, प्रितमताईंनी घेतलेल्या भूमिकेमुळे लवकरच आम्हा सर्वांच्या समस्या सुटतील आणि प्रकल्पाला गती मिळेल अशा भावना यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!